महिलांनी पकडली ३० पेट्या अवैध दारू
By Admin | Updated: October 29, 2014 22:49 IST2014-10-29T22:49:11+5:302014-10-29T22:49:11+5:30
ग्रामीण भागात खुलेआम अवैध दारूविक्रीमुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडत आहे. अवैध दारूविक्रीचा तेथील महिलांना प्रचंड त्रास होत आहे. अवैध दारूविक्री संदर्भात पोलीस प्रशासनाकडे तक्रार

महिलांनी पकडली ३० पेट्या अवैध दारू
एटापल्ली : ग्रामीण भागात खुलेआम अवैध दारूविक्रीमुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडत आहे. अवैध दारूविक्रीचा तेथील महिलांना प्रचंड त्रास होत आहे. अवैध दारूविक्री संदर्भात पोलीस प्रशासनाकडे तक्रार करूनही कारवाई होत नाही, हे निदर्शनास आल्यावर एटापल्ली तालुक्यातील चंदनवेली येथील संतप्त १३ बचत गटाच्या महिलांनी एकत्र येऊन पुरूषाच्या सहकार्याने गावातील अवैध दारूविक्रेत्यांकडून लाखो रूपयाची ३० पेट्या देशी व विदेश दारू मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पकडली व अवैध दारूविक्रेता तिरूपती हरिदास भोवरे (३५) याच्याविरोधात पोलिसात तक्रार करून त्याला अटक करवून घेतली.
चंदनवेली गावात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दारूविक्री होत असल्याचा आरोप बचतगटाच्या महिलांनी केला आहे. गावातील अवैध दारूविक्रीबाबत या महिलांनी यापूर्वी अनेकदा चर्चा घडवून आणली. अखेर २८ आॅक्टोबर मंगळवारला सायंकाळच्या सुमारास गावातील चौकात एकत्र जमल्या. यावेळी पुरूष मंडळींनीही या महिलांना सहकार्य केले. चंदनवेली गावापासून १० किमी अंतरावर असलेल्या एका शेतात धाड टाकून या महिलांनी दारूविक्रेता तिरूपती भोवरे यांची २६ पेट्या देशी दारू, विदेशी तीन पेट्या व काही बाटला पकडल्या. त्यानंतर संतप्त महिलांनी थेट मुलचेरा तालुक्यातील बोलेपल्ली पोलीस मदत केंद्र गाठले. यावेळी महिलांनी दारूविक्रेत्याविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधाारे पोलीस निरिक्षक एम. व्ही. जाधव यांनी दारूविक्रेत्या आरोपीला अटक केली. यापुढे चंदनवेली गावात दारूविक्री होणार नाही, असे आश्वासन ठाणेदार जाधव यांनी उपस्थित महिलांना दिले. सदर अवैध दारू पकडण्यासाठी महिला बचत गटाच्या विमल वैरागडे, विमल लटारे, पुन्नूबाई कालंगा, रासो मट्टामी, मनिषा रापंजी, बल्लू सिडाम, मिराबाई भांडेकर, पेंटूबाई तलांडे, सुमित्रा मडावी, रंजना कोठारे, गीता मट्टामी आदीसह गेदा ग्रा.पं.चे सरपंच नंदू मट्टामी, जि.प. सदस्य कारू रापंजी, केशव कुडहेढी, रवींद्र वैरागडे, देवाजी रापंजी, बिरसू कालंगा आदीनी पुढाकार घेतला. सदर कारवाईसाठी गावातील सर्व महिला व पुरूषांचे सहकार्य लाभले. गावात अवैध दारूविक्री होऊ देणार नाही, असा इशाराही महिलांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)