३ हजार ७१ उमेदवार देणार लेखी परीक्षा
By Admin | Updated: May 3, 2016 01:55 IST2016-05-03T01:55:30+5:302016-05-03T01:55:30+5:30
जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने तब्बल महिनाभर पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणीचा जम्बो कार्यक्रम

३ हजार ७१ उमेदवार देणार लेखी परीक्षा
गडचिरोली : जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने तब्बल महिनाभर पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणीचा जम्बो कार्यक्रम पार पडला. या चाचणीत पात्र झालेले एकूण ३ हजार ७१ उमेदवार ८ मे रोजी गडचिरोली पोलीस मुख्यालयात लेखी परीक्षा देणार आहेत.
जिल्हा प्रशासनाने सुरूवातीला पोलीस शिपायांच्या ८२ पदासाठी भरती प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर या पदभरतीसाठी तब्बल २७ हजार उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले. कागदपत्राची तपासणी पूर्ण झाल्यानंतर उंचीत बसणाऱ्या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली. सदर चाचणीचा कार्यक्रम २५ ते २८ दिवस चालला. कमी उंचीमुळे अनेक उमेदवार शारीरिक चाचणीसाठी अपात्र ठरले तर दुर्गम भागातील काही उमेदवार शारीरिक चाचणीसाठी हजर झाले नाही. जवळपास १५ हजार वर उमेदवारांनी पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी केली. एका पदाला १५ उमेदवार यानुसार एकूण १६७ जागांसाठी ३ हजार ७१ उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. यामध्ये पुरूष २ हजार ५७९ व ४९२ महिला उमेदवारांचा समावेश आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
महिलांसाठी ५० जागा राखीव
४पोलीस शिपाई पदाच्या एकूण १६७ जागांसाठी सदर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये महिलांसाठी ५० जागा राखीव ठेवण्यात आले आहे. यामध्ये खुला प्रवर्गाचे २४, अनुसूचित जाती ६, अनुसूचित जमाती १२, विजअ १, भजब २, भजक १, भजड १, विमाप्र १ व इतर मागासवर्गीयांसाठी ३ जागा आहेत. सदर पोलीस भरतीत एकूण १६७ जागांपैकी खुल्या प्रवर्गासाठी सर्वाधिक ८१, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी २०, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ४० व इतर मागासवर्गीयांसाठी १० जागा आरक्षणानुसार ठेवण्यात आल्या आहेत.