३ हजार ४१२ मजुरांची नोंदणी
By Admin | Updated: May 1, 2016 01:19 IST2016-05-01T01:19:10+5:302016-05-01T01:19:10+5:30
गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराची साधने अपुरी असल्याने मोठ्या प्रमाणावर मजुरांचे बाह्य जिल्ह्यात तसेच राज्यात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे.

३ हजार ४१२ मजुरांची नोंदणी
कामगार दिन : एका वर्षात ३४७ बांधकाम व घरेलू कामगारांची कार्यालयात नोंद
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराची साधने अपुरी असल्याने मोठ्या प्रमाणावर मजुरांचे बाह्य जिल्ह्यात तसेच राज्यात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे. परंतु बांधकाम व घरेलू कामावर बहुतांश मजूर अद्यापही काम करीत आहेत. जिल्ह्यात २०११ पासून मार्च २०१६ पर्यंत बांधकामावर २ हजार ७०६ तर घरेलू कामावर ७०६ असे एकूण ३ हजार ४१२ मजूर असल्याचे जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात केलेल्या नोंदणीवरून दिसून येत आहे.
जिल्ह्यात रोजगाराचा अभाव असल्याने अनेक मजूर बाह्य जिल्हा व परराज्यात स्थलांतर करीत आहेत. विशेषत: आंध्रप्रदेशातील हैद्राबाद व गुजरात राज्यातील सूरत, अहमदाबाद येथे विविध कामासाठी जिल्ह्यातील मजूर पलायन करीत आहेत. या माध्यमातून का होईना जिल्ह्यातील बेरोजगार रोजगार मिळवित आहेत. जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयांतर्गत २०११ पासून मार्च २०१६ या कालावधीत ३ हजार ४१२ बांधकाम व घरेलू कामगारांनी आपल्या नावाची नोंदणी केली आहे. तर २०१५- १६ या कालावधीत २२० बांधकाम मजूर व १२७ असे एकूण ३४७ मजुरांनी नावाची नोंदणी केलेली आहे.
जिल्ह्यात बांधकामावर काम करणाऱ्या काम करणाऱ्या मजुरांची संख्या लक्षणीय आहे. परंतु अनेक मजूर नाव नोंदणी करण्यास धजावत नाही. नाव नोंदणीसाठी लागणाऱ्या प्रक्रियेत गुंतण्यापेक्षा नोंदणी न केलेली बरी, असे अनेकांना वाटते. त्यामुळे जिल्ह्यातील कामगार नाव नोंदणी करण्याबाबत उदासीन आहेत. विविध शासकीय योजनांच्या लाभासाठी नोंदणी असणे गरजेचे असते. (शहर प्रतिनिधी)
कारवाफात आज बांधकाम मजूर नोंदणी
कामगार दिनानिमित्त १ मे रोजी धानोरा तालुक्यातील कारवाफा येथे सकाळी ११ वाजता बांधकाम मजुरी नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथे आश्रमशाळा इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने कामगारांना योजनांची माहिती दिली जाईल, या हेतूनेच सदर कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात बहुसंख्य मजुरांनी उपस्थित राहून नोंदणी करावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी एस. डी. पेंदोर यांनी केले आहे.