३ हजार २०० सायकली
By Admin | Updated: July 27, 2015 03:07 IST2015-07-27T03:07:10+5:302015-07-27T03:07:10+5:30
मानव विकास कार्यक्रम २०१४-१५ अंतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या व

३ हजार २०० सायकली
सावित्रीच्या लेकींच्या दिमतीस : ९६ लाखांतून ९९ शाळांना लाभ
गडचिरोली : मानव विकास कार्यक्रम २०१४-१५ अंतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या व शाळेपासून पाच किमी अंतरावर राहणाऱ्या गरजू मुलींना सायकल वितरित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला ९६ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून जिल्ह्यातील एकूण ९६ शाळांमधील ३ हजार २०० विद्यार्थिनींना मोफत सायकल मिळणार आहे.
मानव विकास कार्यक्रमांतर्गत गतवर्षी २०१४-१५ या सत्रात शिक्षण विभागाच्या वतीने गरजू मुलींना स्वत:च्या गावावरून शाळांमध्ये ये-जा करण्याकरिता वितरित करण्यात आल्या होत्या. मानव विकास निर्देशांकांमध्ये वाढ करण्यासाठी मुलींनी शिक्षण घेणे अत्यावश्यक आहे. शिक्षणातूनच मुली खऱ्या अर्थाने सर्वदृष्टीकोणातून स्वावलंबी बनू शकतात. यासाठीच शासनाच्या वतीने शाळकरी मुलींना सायकलचे वितरण दरवर्षी केल्या जाते. जिल्हाधिकारी यांच्याकडून २०१५-१६ या सत्रात जिल्ह्यातील ९९ शाळांमधील गावावरून ये-जा करणाऱ्या ३ हजार २०० मुलींना सायकल वितरित करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाला ९६ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. सदर निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाला मिळाला असून सायकल वितरणाची कार्यवाही सुरू झाली आहे.
मानव विकास मिशनच्या माध्यमातून ज्या गावांमधून शाळेच्या गावापर्यंत राज्य परिवहन महामंडळाची बस सुविधा आहे. अशा ठिकाणी मानव विकास मिशनच्या स्कूल बसेस विद्यार्थिनींकरिता देण्यात आल्या आहेत. या बस सुविधेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थिनीच्या प्रवासाची सुविधा झाली आहे. आता आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली प्रकल्पाच्या वतीने न्युक्लीअस बजेटच्या निधीतून शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींना शाळा कॉलेजमध्ये जाण्यासाठी सायकली मिळणार आहेत. या संदर्भात गडचिरोली प्रकल्पाच्या वतीने नियोजन करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
दोन तालुक्यातून प्रस्ताव नाहीत
४मानव विकास मिशन कार्यक्रमांतर्गत पाच किमी अंतरावरून शाळांमध्ये ये-जा करणाऱ्या इयत्ता आठ ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना सायकल देण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने शाळांना प्रस्ताव मागविले होते. यात १० तालुक्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले व ते मंजूरही करण्यात आले. मात्र देसाईगंज व भामरागड या दोन तालुक्यांतून सायकली संदर्भात शाळांचे प्रस्ताव दाखल झाले नाहीत.