२७ वर्षांनंतर नळाचे पाणी पोहोचले
By Admin | Updated: June 22, 2016 00:51 IST2016-06-22T00:51:57+5:302016-06-22T00:51:57+5:30
राजनगरी अहेरीच्या गुप्पा परिसरात गेल्या २७ वर्षांत कोणत्याही प्रकारची नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली नाही.

२७ वर्षांनंतर नळाचे पाणी पोहोचले
गुप्पा परिसरातील नागरिक आनंदी : नगरसेवकाला पहिला पाण्याचा ग्लास भरविला
अहेरी : राजनगरी अहेरीच्या गुप्पा परिसरात गेल्या २७ वर्षांत कोणत्याही प्रकारची नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली नाही. तसेच या परिसरात नव्याने पाईपलाईन टाकून पाणीपुरवठ्याची सोय करण्यात आली नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना लांब अंतरावरून पाणी आणावे लागत होते. ही अडचण लक्षात घेऊन या वॉर्डाचे नगरसेवक अमोल मुक्कावार यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सातत्त्याने पाठपुरावा करून या परिसरासाठी विशेष नळ योजना मंजूर करून घेतली. त्यामुळे तब्बल २७ वर्षांनंतर गुप्पा परिसरातील नागरिकांना नळाचे पाणी मिळाले.
मंगळवारी अमोल मुक्कावार यांनी गुप्पा परिसरातील नळाची विधीवत पूजा करून पाणीपुरवठा सुरू केला. विशेष म्हणजे यावेळी नळाचे पाणी घेतलेल्या महिलांनी सदर नळाच्या पाण्याचा पहिला ग्लास नगरसेवक मुक्कावार यांना पाजला. यापूर्वी गुप्पा परिसरात कोणत्याही प्रकारची नळ योजना नसल्याने नागरिकांना हातपंप अथवा विहिरीचे पाणी भरावे लागत होते. दरवर्षीच्या उन्हाळ्यात पाण्याची पातळी खालावल्यानंतर येथील विहीर कोरडी पडत होती. तसेच हातपंपाला पाणी येत नव्हते. परिणामी नागरिकांची पाण्यासाठी प्रचंड पायपीट होत होती.
विशेष नळ योजना मंजूर करून ती कार्यान्वित करण्यात आली. यामध्ये नगर सेवक अमोल मुक्कावार यांचा मोलाचा वाटा आहे. मंगळवारी प्रथमच गुप्पा परिसरात नळाद्वारे पाणी आल्याने या परिसरातील नागरिकांनी आनंद व समाधान व्यक्त केले. नगर सेवक अमोल मुक्कावार यांचे पुष्पगुच्छ देऊन वॉर्डातील नागरिकांनी स्वागत केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अनुराग जक्कोजवार, अमोल श्रीरामवार आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
गुप्पा परिसरात दरवर्षी नळ पाणीपुरवठा योजनेअभावी नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत होते. यासंदर्भात येथील नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. निवेदन देऊन अनेकदा पाठपुरावा केला. मात्र साऱ्या लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष झाले होते. (शहर प्रतिनिधी)
अनेक वर्षांपासूनच्या पाठपुराव्याला यश
नगरसेवक अमोल मुक्कावार यांनी गुप्पा परिसरात भेटी देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. यापूर्वीही ते या भागातील समस्यांप्रती ज्ञात होते. नगरसेवक होण्यापूर्वी सामाजिक कार्य करताना गुप्पा परिसरातील पाणीटंचाईच्या समस्येची दखल मुक्कावार यांनी घेतली. त्यानंतर नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर मुक्कावार यांनी गुप्पा परिसरातील पाणीटंचाई प्रश्नावर लक्ष केंद्रित केले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे गुप्पा परिसरात विशेष नळ योजना मंजूर करण्यासंदर्भात त्यांनी प्रस्ताव सादर केला होता. मात्र यात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे सदर नळ योजनेच्या मंजुरीची प्रक्रिया काही दिवस थंडबस्त्यात होती. त्यानंतर मुक्कावार यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाकडे प्रचंड पाठपुरावा करून गुप्पा परिसरासाठी विशेष नळ योजना मंजूर करून घेतली. नगरसेवक मुक्कावार यांच्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्यामुळे गुप्पा परिसरात नळ योजना कार्यान्वित झाली.