२६४ घरकूल अपूर्ण
By Admin | Updated: April 3, 2016 03:50 IST2016-04-03T03:50:40+5:302016-04-03T03:50:40+5:30
राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या शबरी घरकूल योजनेंतर्गत गडचिरोली व सिरोंचा प्रकल्प कार्यालयांतर्गत सहा तालुक्यात एकूण ३५६ घरकूल मंजूर करण्यात आले.

२६४ घरकूल अपूर्ण
शबरी घरकूल योजना : जिल्ह्यातील लाभार्थ्यांची अनास्था
गडचिरोली : राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या शबरी घरकूल योजनेंतर्गत गडचिरोली व सिरोंचा प्रकल्प कार्यालयांतर्गत सहा तालुक्यात एकूण ३५६ घरकूल मंजूर करण्यात आले. यापैकी आतापर्यंत केवळ ११ घरकूल पूर्ण झाले आहे तर २६४ घरकूल अद्यापही अपूर्ण स्थितीत आहे. लाभार्थ्यांच्या अनास्थेमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या घरकुलाचे काम मंदगतीने सुरू असल्याची माहिती जि.प.च्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे.
राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या रमाई घरकूल योजनेच्या धर्तीवर राज्यातील बेघर अथवा ज्यांची घरे माती ,कुडाची आहेत, अशा आदिवासी कुटुंबांना सरकारी अनुदानातून घर देण्याची शबरी घरकूल योजना राबविण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने २८ मार्च २०१३ रोजी घेतला होता. गडचिरोली जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी सन २०१४ पासून सुरू झाली. शासनाने गडचिरोली व अहेरी प्रकल्प कार्यालयांतर्गत गडचिरोली, चामोर्शी, धानोरा, अहेरी, मुलचेरा, सिरोंचा या सहा तालुक्यांसाठी एकूण ३५६ घरकुलांचे उद्दीष्ट दिले. उद्दिष्टाइतकेच घरकूल मंजूर करण्यात आले. या योजनेची अंमलबजावणी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गडचिरोलीमार्फत पंचायत समितीस्तरावर सुरू आहे. राज्याच्या आदिवासी विकास विभागाने जिल्हा विकास ग्रामीण यंत्रणेकडे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी निधी वर्ग केला आहे.
या योजनेंतर्गत गडचिरोली तालुक्यात ८३, चामोर्शी तालुक्यात ९८, धानोरा तालुक्यात ८ असे एकूण १८९ घरकूल गडचिरोली प्रकल्पांतर्गत मंजूर करण्यात आले आहे. अहेरी प्रकल्पांतर्गत सिरोंचा तालुक्यात ३२, मुलचेरा ३९ व अहेरी तालुक्यात ९६ घरकूल मंजूर करण्यात आले आहे. मंजूर एकूण ३५६ घरकुलांपैकी ११ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. तर २७५ घरकूल सुरू आहे. तसेच २६४ घरकूल अपूर्ण आहे. पूर्ण झालेल्या घरकुलांमध्ये गडचिरोली तालुक्यातील नऊ, धानोरा एक, मुलचेरा व सिरोंचा तालुक्यातील एका घरकुलाचा समावेश आहे. आदिवासी विकास विभागाच्या योजनेमुळे सरकारी अनुदानातून आदिवासी लाभार्थ्यांना हक्काचे घरकूल मिळत आहे. गडचिरोली जिल्ह्यात आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या आदिवासी कुटुंबांची संख्या प्रचंड आहे. या आदिवासी लाभार्थ्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाने सदर योजना हाती घेतली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
चार कोटींच्या निधी खर्चास मान्यता
सन २०१५-१६ वर्षाकरिता आदिम जमातीचा विकास या राज्य योजनेंतर्गत आदिम जमातीच्या कुटुंबांकरिता घरकूल बांधण्यासाठी राज्याच्या आदिवासी विकास विभागाने गडचिरोली जिल्ह्याकरिता ४ कोटी ६७ लाख रूपयांच्या निधी खर्चास मान्यता प्रदान केली आहे. या संदर्भात राज्याच्या आदिवासी विकास विभागाने ३१ मार्च २०१६ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात माडिया या आदिम जमातीच्या एकूण ४६७ घरकुलांसाठी सदर निधी खर्चास मान्यता प्रदान केली आहे.
८१ घरकुलांना प्रारंभ नाही
शबरी घरकूल योजनेंतर्गत अद्यापही ८१ घरकुलाच्या कामांना प्रारभच झाला नाही. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील दोन, चामोर्शी तालुक्यातील २०, अहेरी ५६ व सिरोंचा तालुक्यातील तीन घरकुलांचा समावेश आहे. यावरून लाभार्थ्यांची बांधकामाबाबत अनास्था असल्याचे दिसून येत आहे.
प्रती लाभार्थी एक लाख रूपये मिळते अनुदान
राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या शबरी घरकूल योजनेंतर्गत लाभार्थ्यांना प्रती घरकूल एक लाख रूपयांचे अनुदान दिले जाते. घराचे बांधकाम पाहून पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसऱ्या हप्त्यानुसार संबंधित लाभार्थ्यांना घरकुलासाठी अनुदानाची रक्कम अदा केली जाते.