२६९२ बालके कमी वजनाची
By Admin | Updated: March 7, 2017 00:45 IST2017-03-07T00:45:08+5:302017-03-07T00:45:08+5:30
जिल्हा परिषदेच्या बाल कल्याण विभागामार्फत बाराही तालुक्यातील जवळपास दोन हजार अंगणवाडी केंद्रांतर्गत बालकांचे वजन घेऊन कुपोषणाबाबत सर्वेक्षण करण्यात आले.

२६९२ बालके कमी वजनाची
सर्वेक्षणाच्या अहवालात उघड : जिल्ह्यात कुपोषणाची समस्या कायम
दिलीप दहेलकर गडचिरोली
जिल्हा परिषदेच्या बाल कल्याण विभागामार्फत बाराही तालुक्यातील जवळपास दोन हजार अंगणवाडी केंद्रांतर्गत बालकांचे वजन घेऊन कुपोषणाबाबत सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल २ हजार ६९२ बालके कमी वजनाची आढळून आली. सदर धक्कादायक माहिती जानेवारी २०१७ च्या अहवालात उघड झाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी आदिवासी विकास विभागाच्या पुढाकाराने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना गतवर्षीपासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत गरोदर व स्तनदा माताना एकवेळ चौरस आहार दिला जातो. याशिवाय सदर योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत शुन्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांना केळी, अंडी व इतर फळांचा लाभ दिला जातो. सदर योजनेची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यात सुरू आहे. मात्र जिल्ह्यातील कुपोषणाची तीव्रता झपाट्याने कमी करण्यात प्रशासकीय यंत्रणेला अद्यापही यश आल्याचे दिसून येत नाही. बाराही तालुक्यातील ८० हजार ३२३ इतक्या शुन्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये १२ हजार ६६ बालके मध्यम कमी वजनाची आढळून आली. तर २ हजार ६९२ बालके तीव्र कमी वजनाची आढळून आली. तीव्र कमी वजनाच्या बालकांची गडचिरोली जिल्ह्यातील टक्केवारी ३.३५ आहे. यामध्ये अहेरी तालुक्यातील २००, आरमोरी २६७, भामरागड २५७, चामोर्शी ४००, देसाईगंज ११३, धानोरा १९८, एटापल्ली २७२, गडचिरोली २७३, कोरची १६९, कुरखेडा २०७, मुलचेरा १४४ व सिरोंचा तालुक्यातील १९२ बालके कमी वजनाची आहेत. कुपोषणाचे सर्वेक्षण मॅम व सॅम या दोन प्रकारात केले जाते. सॅम प्रकारातील बालके अधिक कमी वजनाचे राहत असून यांच्या आहार व आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यानंतरच सदर बालके कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर येतात. ८० हजार ३२३ बालकांचे वजन घेण्यात आले.
१७७ बालकांची उंची कमी
वजन व उंचीनुसार सर्वेक्षण केले जाते. शुन्य ते पाच वर्ष वयोगटातील एकूण १ हजार ८९ बालकांचे उंचीनुसार सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये ९१२ बालकांची उंची वयानुसार योग्यरित्या आढळून आली. मात्र १७७ बालकांचे उंची कमी असल्याचे जानेवारी २०१७ च्या अहवालात नमूद आहे.
कुपोषणाचे प्रमाण भामरागडात अधिक
भामरागड या नक्षलप्रभावित अतिदुर्गम तालुक्यात कमी वजनाचे म्हणजे, कुपोषीत बालकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ७ टक्के बालकांचे वजन या तालुक्यात कमी आहे. उंचीनुसार कमी वजनाच्या बालकांची टक्केवारी २.४८ तर डब्ल्यूएचओनुसार २३.११ टक्के बालके कुपोषीत आहेत.