२५ जि. प. शाळांना क्रीडा साहित्य वाटप
By Admin | Updated: December 10, 2015 01:45 IST2015-12-10T01:45:45+5:302015-12-10T01:45:45+5:30
शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली, धनकवडी पुणे येथील आदर्श मित्र मंडळ तथा श्रीलक्ष्मी नृसिंह नागरी सहकारी पतसंस्था बल्लारपूर

२५ जि. प. शाळांना क्रीडा साहित्य वाटप
पुण्यातील आदर्श मित्र मंडळाचे दातृत्व : सुदृढ व संस्कारक्षम पिढी घडविण्याचा प्रयत्न
गडचिरोली : शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली, धनकवडी पुणे येथील आदर्श मित्र मंडळ तथा श्रीलक्ष्मी नृसिंह नागरी सहकारी पतसंस्था बल्लारपूर आणि राष्ट्रीय कला अकादमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आयोजित छोटेखानी कार्यक्रमात जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील २५ जि.प. शाळांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जि. प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष उदय जगताप, श्रीनिवास सुंचुवार, नागपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या मंगला देशमुख, प्राथमिक शिक्षणाधिकारी माणिक साखरे, जि. प. हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जी. बी. थूल आदी उपस्थित होते.
यावेळी उदय जगताप म्हणाले, आर्थिक परिस्थितीमुळे गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील शाळकरी मुलांचे बालपण हरविले आहे. हे बालपण पुन्हा निर्माण करण्यासाठी संस्थेने साहित्य वाटप व शाळांना विविध सोयीसुविधा पुरविण्याचे कार्य हाती घेतले आहे.
मोबाईल, व्हॉटअॅप व सोशल नेटवर्र्किंगचे फॅड युवा वर्गात वाढत चालले आहे. परिणामी त्यांचे शारीरिक आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे विविध क्रीडा साहित्याच्या सहाय्याने मोकळ्या हवेत सांघिक खेळ खेळणे अत्यावश्यक आहे. यातून मुले सुदृढ होतात, असे जि. प. सीईओ संपदा मेहता यांनी सांगितले. यावेळी जि. प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, श्रीनिवास सुंचूवार यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्राथमिक शिक्षणाधिकारी माणिक साखरे यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)