माडिया जमातीच्या २५० लाभार्थ्यांना मिळणार घरकूल
By Admin | Updated: July 4, 2015 02:22 IST2015-07-04T02:22:39+5:302015-07-04T02:22:39+5:30
आदिवासी समाजातील सर्वात दुर्गम भागात राहणाऱ्या माडिया जमातीसाठी आदिवासी विकास विभागाने यावर्षी २५० घरकूल मंजूर केले असून ...

माडिया जमातीच्या २५० लाभार्थ्यांना मिळणार घरकूल
गडचिरोली : आदिवासी समाजातील सर्वात दुर्गम भागात राहणाऱ्या माडिया जमातीसाठी आदिवासी विकास विभागाने यावर्षी २५० घरकूल मंजूर केले असून या घरकुलांचे बांधकाम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यासाठी अडीच कोटी रूपयांचा निधीही प्राप्त झाला आहे.
आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी स्वतंत्र आदिवासी विकास विभाग स्थापन करून या विभागाच्या मार्फतीने शेकडो योजना राबविल्या जात आहेत. मात्र या योजनांचा लाभ आदिवासी समाजातील काही निवडक जमातींनाच मिळत आहे. आदिम जमाती मात्र या लाभापासून वंचित आहे. त्यामुळे त्यांचा अजुनही विकास झाला नसल्याचे दिसून आले आहे. अजुनही आदिम जमातीतील नागरिक झोपडीवजा घरामध्येच जीवन कंठत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात माडिया ही एकमेव आदिम जमात आहे. या जमातीसाठी यावर्षी २५० घरकूल मंजूर करण्यात आले आहेत. या घरकुलांचे बांधकाम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. प्रत्येक घरकुलासाठी एक लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया डीआरडीएसोबतच आदिवासी विकास विभागाच्या मार्फतीनेही करण्यात येणार आहे. मागील वर्षी १६९ घरकूल मंजूर करण्यात आले होते. या घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहेत. तर काही घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
नवीन लाभार्थ्यांची निवड डीआरडीएकडे असलेल्या प्रतीक्षा यादीतून केली जाणार आहे. त्याव्यतिरिक्तच्या लाभार्थ्याने अर्ज केल्यास त्याचाही अर्ज स्वीकारला जाणार आहे. अधिकारी वर्गाकडून त्याच्या अर्जाची शहानिशा केल्यानंतरच घरकूल मंजूर केले जाणार आहे. घरकूल बांधकामासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे २ कोटी ५० लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. घरकूल लाभार्थ्यांची निवड लवकरच केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन आदिवासी विकास विभागाच्या मार्फतीने केले आहे.
आदिवासीमध्ये मोडणाऱ्या आदिम जमाती या सर्वात मागास जमाती आहेत. या जमातीच्या विकासासाठी विशेष बाब म्हणून राज्य शासनाकडून विशेष योजना राबविल्या जातात. गडचिरोली जिल्ह्यात माडिया ही एकमेव आदिम जमात आहे. त्यामुळे या जमातीच्या नागरिकांसाठी घरकूल योजना राबविली जात असून याचा फायदा त्यांना देण्यात येणार आहे.
घरकुलासाठी अर्ज करण्याची पध्दत
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याने त्याच्या ग्रामपंचायतीकडे या संदर्भातील अर्ज सादर करावा, अर्जासोबत पाणीपट्टीकर, विद्युत बिल, सातबारा, मालमत्ता नोंदणीपत्र, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, निवडणूक ओळखपत्र, रेशन कार्ड, सरपंच व तलाठ्याचा दाखला आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. ही कागदपत्रे जोडलेला अर्ज ग्रामपंचायतीच्या मार्फतीने पाठविता येणार आहे.