२३० शाळाबाह्य विद्यार्थ्यांना केले शाळेत दाखल
By Admin | Updated: February 3, 2016 01:40 IST2016-02-03T01:40:07+5:302016-02-03T01:40:07+5:30
१५ ते ३१ जानेवारी दरम्यान शिक्षण विभागाने एनएसएसचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था यांच्या मार्फतीने शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहीम राबविली होती.

२३० शाळाबाह्य विद्यार्थ्यांना केले शाळेत दाखल
गडचिरोली : १५ ते ३१ जानेवारी दरम्यान शिक्षण विभागाने एनएसएसचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था यांच्या मार्फतीने शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहीम राबविली होती. या शोधमोहिमेदरम्यान २३० विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचे आढळून आले असून या सर्वच विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आणखी शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे.
शिक्षणहक्क कायद्यानुसार ६ ते १४ या वयोगटातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क प्राप्त झाला आहे. या कायद्यानुसार देशातील एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये यासाठी शासन व प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. मागील वर्षीही शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहीम राबविण्यात आली होती. मात्र या शोधमोहीमेवर आक्षेप घेऊन आणखी काही विद्यार्थी शाळाबाह्य आहेत, असा आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे शिक्षण विभागाने संपूर्ण राज्यात १५ ते ३१ जानेवारी दरम्यान शिक्षण विभागाचे कर्मचारी, वरिष्ठ महाविद्यालयांच्या एनएसएसचे विद्यार्थी व स्वयंसेवी संस्थांच्या मार्फतीने शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहीम राबविली होती. ही मोहीम गडचिरोली जिल्ह्यातही राबविली गेली. या मोहिमेदरम्यान सुमारे २३० विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये चार विद्यार्थी कधीही शाळेत गेले नव्हते. १८० विद्यार्थी मागील एक महिन्यापासून शाळेत येत नव्हते. तर ४६ विद्यार्थी स्थलांतर करून आपल्या पाल्यांसोबत आले असल्याचे पाहणीदरम्यान आढळून आले. या सर्वच विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत दाखल करण्यात आले आहे. एटापल्ली, भामरागड, कोरची, कुरखेडा, अहेरी हे तालुके आदिवासी बहूल व मागासलेले आहेत. या तालुक्यांमध्ये शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे या पाहणीदरम्यान दिसून आले आहे. (नगर प्रतिनिधी)