२३ हजार लिटर दूध उत्पादन वाढले

By Admin | Updated: February 28, 2015 01:32 IST2015-02-28T01:32:22+5:302015-02-28T01:32:22+5:30

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने गतवर्षी २०१३-१४ मध्ये जिल्ह्यातील २२२ गावांमध्ये कामधेनू दत्तक ग्राम योजना प्रभावीपणे राबविली.

23 thousand liters of milk production increased | २३ हजार लिटर दूध उत्पादन वाढले

२३ हजार लिटर दूध उत्पादन वाढले

लोकमत विशेष
दिलीप दहेलकर गडचिरोली
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने गतवर्षी २०१३-१४ मध्ये जिल्ह्यातील २२२ गावांमध्ये कामधेनू दत्तक ग्राम योजना प्रभावीपणे राबविली. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात वर्षभरात २३ हजार २३६ लिटर दूध उत्पादन वाढले असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे कामधेनू दत्तक ग्राम योजना पशुपालकांसाठी नवसंजीवनी ठरली आहे.
कामधेनू दत्तक ग्राम योजनेंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या वतीने गतवर्षी २०१३-१४ मध्ये जिल्हाभरात २२२ गावांची निवड करण्यात आली. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील १५, चामोर्शी तालुक्यातील ३५, मुलचेरा तालुक्यातील १२, कुरखेडा तालुक्यातील १५, देसाईगंज तालुक्यातील ६, सिरोंचा १५, कोरची १०, आरमोरी १७, एटापल्ली ३२, धानोरा २०, भामरागड १० व अहेरी तालुक्यातील ३५ गावांचा समावेश आहे.
पशुसंवर्धन विभागाने पशुवैैद्यकीय संस्थेंतर्गत निवड केलेल्या २२२ गावांमध्ये शिबिर आयोजित करून कामधेनू योजनेची माहिती पशुपालकांना दिली. याशिवाय या गावांमध्ये पशुपालकांसाठी शैक्षणिक सहल, गावातील पशुधनाची अद्यावत पशुगणना, गावांमध्ये पशुपालक मंडळाची स्थापना, गामस्तरावर विशेष ग्रामसभा, जंतानाशक शिबिर, गोचीड गोमाशा निर्मूलन शिबिर, रोगप्रतिबंधक लसीकरण शिबिर, खनिजद्रव्य मिश्रण व जीवनसत्वाचा पुरवठा, वंधत्व निवारण व औषधोपचार शिबिर, निकृष्ट चारा सकस करण्याचे प्रात्यक्षिक, जनावरांचे मलमूत्र व वाया गेलेल्या चाऱ्याचे खत व्यवस्थापन आणि वैरण विकास आदी उपक्रम राबविले. यातून २२२ गावांमधील पशुधनाचा विकास करण्यात यश आल्याचा दावा जि.प. पशुसंवर्धन विभागाने केला आहे.
यंदा योजनेसाठी ११२ गावांची निवड
कामधेनू दत्तक ग्राम योजनेसाठी यंदा २०१४-१५ या वर्षात जिल्ह्यातील ११२ गावांची निवड करण्यात आली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ९८ गावांमध्ये पशुपालक मंडळाची स्थापना करण्यात आली असून १०५ गावांमध्ये ग्रामसभा आयोजित करून कामधेनू दत्तक योजनेची जनजागृती करण्यात आली. डिसेंबर अखेरपर्यंत ११२ गावांमध्ये शिबिर आयोजित करण्यात आले. यंदा या योजनेसाठी ३२० लक्ष रूपयांची तरतूद करण्यात आली असून १९२ लक्ष रूपये प्राप्त झाले असून यापैकी १५६.२३ लक्ष रूपये खर्च झाले. खर्चाची टक्केवारी ८१.३७ आहे.
अशी झाली दूध उत्पादनात वाढ
कामधेनू दत्त ग्राम योजनेंतर्गत २०१३-१४ या वर्षी निवड केलेल्या २२२ गावातील जनावरांवर औषधोपचार करण्यात आले. वंधत्व निवारणासाठी या गावातील जनावरांवर विशेष उपचार करण्यात आला. उपचार केलेल्या ५८ हजार ८३० जनावरांपैकी २६ हजार ४७४ जनावरे गाभण राहिली. १०२२.३० हेक्टर क्षेत्र चारा लागवडीखाली आणण्यात आले असून १ लाख ३२ हजार ६४८ क्विंटल इतकी हिरवी वैरण उपलब्ध झाली. या चाऱ्याचा उपयोग जनावरांसाठी झाला. यातून गाभण राहिलेल्या जनावरांच्या दूध उत्पादनात वाढ झाली. सदर योजना राबविण्यापूर्वी या २२२ गावांमधील दुभत्या जनावरांकडून ७७ हजार ७३ लिटर दूध उत्पादन मिळाले. योजना राबविल्यानंतर याच गावातील जनावरांकडून १ लाख ३०९ लिटर दूध उत्पादन होऊन वर्षभरात २३ हजार २३६ लिटर दुुधाची भर पडली.

Web Title: 23 thousand liters of milk production increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.