५१ जागांसाठी २२८ उमेदवार रिंगणात
By Admin | Updated: October 24, 2015 00:55 IST2015-10-24T00:55:57+5:302015-10-24T00:55:57+5:30
दुसऱ्या टप्प्यात ६ नोव्हेंबर २०१५ रोजी निवडणूक होऊ घातलेल्या धानोरा, कुरखेडा व कोरची या तीन नगर पंचायत निवडणुकीत

५१ जागांसाठी २२८ उमेदवार रिंगणात
तीन नगर पंचायती : १६ उमेदवारांनी घेतली माघार
गडचिरोली : दुसऱ्या टप्प्यात ६ नोव्हेंबर २०१५ रोजी निवडणूक होऊ घातलेल्या धानोरा, कुरखेडा व कोरची या तीन नगर पंचायत निवडणुकीत छाननीअंती व नामांकन अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर ५१ जागांसाठी एकूण २२८ उमेदवार रिंगणात उभे ठाकले आहेत.
कोरची नगर पंचायत निवडणुकीमध्ये १७ जागांसाठी एकूण ७१ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. यापैकी पाच उमेदवारांनी शुक्रवारी आपले नामांकन अर्ज मागे घेतले. यामध्ये प्रभाग क्रमांक १ मधून घनशाम अग्रवाल, प्रभाग क्रमांक ५ मधून ज्योती नैताम, प्रभाग क्रमांक ७ मधून रमेश पोरेटी, धनराज मडावी व प्रभाग क्रमांक ११ मधून सरजूराम जमकातन यांचा समावेश आहे. आता कुरखेडा नगर पंचायत निवडणुकीत १७ जागांसाठी ५९ उमेदवार रिंगणात आहेत. (प्रतिनिधी)
धानोरा नगर पंचायत निवडणुकीकरिता १७ जागांसाठी एकूण ८० उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. यापैकी शुक्रवारी मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सात उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतले. यामध्ये प्रभाग क्रमांक १ मधून समीर अजिज कुरेशी, लवेश रामचंद्र मने, प्रभाग क्रमांक ३ मधून मारोती तेजुजी भैसारे, प्रभाग क्रमांक ६ मधून विभा प्रकाश धाईत, प्रभाग क्रमांक ८ मधून नरेश राजाराम बोडगेवार, प्रभाग क्रमांक १३ मधून सुजित शंभु आतला व प्रभाग क्रमांक १४ मधून पुरूषोत्तम खुशाल ढवळे यांचा समावेश आहे. आता धानोरा नगर पंचायतीमध्ये १७ जागांसाठी ७३ उमेदवार रिंगणात शिल्लक आहेत.
कुरखेडा नगरपंचायत निवडणुकीत १७ जागांसाठी एकूण १०० उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी नामांकन अर्ज परत घेण्याच्या अखेरच्या दिवशी चार उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेतले. यामध्ये प्रभाग क्रमांक १ मधून रामहरी उगले, प्रभाग क्रमांक ३ मधून शाहेदा मुगल, प्रभाग क्रमांक ८ मधून कुणाल गुलाबराव डांगे व प्रभाग क्रमांक १३ मधून शेवंताबाई हेटकर यांचा समावेश आहे. शाहेदा मुगल यांनी प्रभाग क्रमांक ३ मधून नामांकन अर्ज मागे घेतले. मात्र प्रभाग क्रमांक १४ मधील आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. प्रभाग क्रमांक १३ मधून शेवंताबाई हेटकर यांनी आपला नामांकन अर्ज मागे घेतला आहे. मात्र त्यांनी राकाँच्या अधिकृत उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक १५ मधील आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. आता कुरखेडा नगर पंचायत निवडणुकीमध्ये १७ जागांसाठी ९६ उमेदवार रिंगणात उभे ठाकले आहेत.