२२५ एसटी कर्मचारी सक्तीच्या अर्जित रजेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:01 IST2020-07-21T05:00:00+5:302020-07-21T05:01:30+5:30
लॉकडाऊन झाल्यापासून एसटीची चाके थांबली आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती बेताची होत चालली आहे. यात सर्वाधिक खर्च कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होत आहे. २२ मार्चपासून एसटीची सेवा बंद झाली. तरीही एसटीने मार्च, एप्रिल व मे महिन्याचे वेतन काही प्रमाणात कर्मचाऱ्यांना अदा केला आहे.

२२५ एसटी कर्मचारी सक्तीच्या अर्जित रजेवर
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली आगारातील २२५ एसटी कर्मचाऱ्यांना १५ जुलै ते ३ ऑगस्टपर्यंत २० दिवसांच्या सक्तीच्या अर्जित रजेवर पाठविण्यात आले आहे. या माध्यमातून एसटी आपला खर्च वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे.
लॉकडाऊन झाल्यापासून एसटीची चाके थांबली आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती बेताची होत चालली आहे. यात सर्वाधिक खर्च कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होत आहे. २२ मार्चपासून एसटीची सेवा बंद झाली. तरीही एसटीने मार्च, एप्रिल व मे महिन्याचे वेतन काही प्रमाणात कर्मचाऱ्यांना अदा केला आहे.
सद्य:स्थितीत जिल्हांतर्गत बस वाहतुकीला परवानगी देण्यात आली असली तरी या बसेसला प्रवाशी मिळत नाही. तसेच अत्यंत मोजक्या बसफेऱ्या सुरू आहेत. कोरोनाचा विघ्न आणखी काही दिवस राहण्याची शक्यता आहे. तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देऊन एसटी महामंडळाचा आर्थिक डोलारा सांभाळणे कठीण होणार आहे. त्यामुळे महामंडळाच्या व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या वेतनातच कपात करण्याच्या कामाला सुरूवात केली आहे. मे महिन्याचे अर्धेच वेतन देण्यात आले आहे.
पुन्हा काटकसर करताना वाहक, चालक यांत्रिकी कर्मचारी व वाहतूक नियंत्रकांना २० दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी गडचिरोली आगारात करताना २२५ कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. यामध्ये ९० चालक, ९७ वाहक, २३ यांत्रिकी व ५ वाहतूक नियंत्रकांचा समावेश आहे.
२८ चालक-वाहकांचाही रोजगार जाणार
नियमित कर्मचाऱ्यांना दरवर्षी ४० अर्जित रजा दिल्या जातात. यापैकी सेवानिवृत्तीपर्यंत ३०० रजा शिल्लक असल्यास तेवढ्या रजांचे वेतन सेवानिवृत्तीनंतर दिले जाते. त्यापेक्षा जास्त रजा असल्यास अतिरिक्त रजांचा लाभ दिला जात नाही. अर्जित रजांचा वापर मंदीच्या कालावधीत व्यवस्थापन सांगेल तेव्हा करावा लागेल, अशी अट एसटी महामंडळ व कर्मचारी यांच्या दरम्यान होणाऱ्या करारात समाविष्ट आहे. याचा फायदा उचलत व्यवस्थापनाने कर्मचाºयांना सक्तीच्या अर्जित रजेवर पाठविले आहे. सहा महिन्यांपूर्वी २८ चालक कम वाहकांना रोजंदारी तत्वावर नेमण्यात आले होते. या सर्वांची सेवा खंडीत करण्यात आली आहे. त्यामुळे या कर्मचाºयांचाही रोजगार हिरावला जाण्याची शक्यता आहे.