टीईसाठी २,२०० अर्ज

By Admin | Updated: October 26, 2014 22:39 IST2014-10-26T22:39:16+5:302014-10-26T22:39:16+5:30

गतवर्षीपासून राज्य शासनाने राज्यभरातील सर्व भावी तसेच १३ फेब्रुवारी २०१३ नंतर सेवेत रूजू झालेल्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या कार्यरत शिक्षकांना शिक्षक

2,200 applications for TE | टीईसाठी २,२०० अर्ज

टीईसाठी २,२०० अर्ज

आॅनलाईनची मुदत संपली : गतवर्षीच्या तुलनेत केवळ १० टक्केच अर्ज
गडचिरोली : गतवर्षीपासून राज्य शासनाने राज्यभरातील सर्व भावी तसेच १३ फेब्रुवारी २०१३ नंतर सेवेत रूजू झालेल्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या कार्यरत शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केली आहे. मात्र शिक्षकाच्या नोकरीची हमी नसल्याने जिल्हाभरातून आतापर्यंत २ हजार २०१ अर्ज दिवाळीपूर्वी प्राप्त झाले आहेत. दिवाळीनंतर सदर टीईटीच्या अर्जाची संख्या ३ हजाराच्या आतच राहणार असल्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या तुलनेत केवळ १० टक्केच अर्ज प्राप्त होणार असून यंदा भावी शिक्षकांनी टीईटी परीक्षेकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून येते.
गतवर्षी १५ डिसेंबर २०१३ रोजी गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर तब्बल तीन महिन्याच्या कालावधीने या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला होता. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या जिल्ह्यातील पात्र भावी शिक्षकांची संख्या फारच कमी होती. त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर पसरला होता. गतवर्षी प्रमाणे यंदाही शिक्षक पात्रता परीक्षेसाठी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. विशेष म्हणजे गतवर्षी टीईटी परीक्षेचा निकाल फारच कमी लागल्याने यंदा टीईटी परीक्षेत पात्र होण्यासाठी गुणांची अट शिथील करण्यात आली आहे. गतवर्षी झालेल्या टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर होऊन सात महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र गतवर्षीच्या शिक्षक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांना नोकरी देण्यात आली नाही. त्यामुळे पात्र ठरलेल्या भावी शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. शासनाने शिक्षकपदाची भरती न करता पुन्हा यंदाही शिक्षक पात्रता परीक्षेचा बिगुल फुंकला आहे.
यंदा टीईटी परीक्षेत खुल्या उमेदवारांना ५० गुणांची तर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४५ गुणांची अट शिथील करण्यात आली आहे. शिक्षणाच्या अधिकार अधिनियमानुसार इयत्ता १ ली ते ५ वी तसेच इयत्ता ६ वी ते ८ वीला अध्यापन करणाऱ्या शिक्षण सेवक उमेदवाराला शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. सदर शिक्षक पात्रता परीक्षा यंदा १४ डिसेंबर २०१४ रोजी घेण्यात येणार आहे. गतवर्षी टीईटी परीक्षेसाठी केवळ जिल्हास्तरावरच आॅनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा होती. मात्र यंदा प्रथमच या परीक्षेचे अर्ज स्वीकारण्यासाठी जिल्ह्यात बाराही तालुकास्तरावर पंचायत समितीच्या शिक्षण विभागात स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली होती. या परीक्षेसाठी २७ सप्टेंबरपासून तर २२ आॅक्टोबरपर्यंत आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यात आले. या परीक्षेसाठी आॅपलाईन हार्डकॉपी स्वरूपात अर्ज स्वीकारण्याची मुदत ३० आॅक्टोबरपर्यंत आहे. जिल्हाभरातून या टीईटी परीक्षेसाठी २० आॅक्टोबर २०१४ पर्यंत एकूण १ हजार ९५१ अर्ज जि. प. च्या शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहे. २० आॅक्टोबरपर्यंत गडचिरोली मुख्यालयाच्या जि. प. च्या संकलन केंद्रात पेपर क्रमांक १ साठी ३२३, पेपर क्रमांक २ साठी ६३ व पेपर क्रमांक १ व २ साठी ९३ असे एकूण ४७९ अर्ज प्राप्त झाले आहेत. गडचिरोली पंचायत समिती शिक्षण विभागाच्या संकलन केंद्रात गडचिरोली तालुक्यातून पेपर क्रमांक १ साठी १७६, पेपर क्रमांक २ साठी ५१ व पेपर क्रमांक १ व २ साठी ४५ असे एकूण २७२ अर्ज प्राप्त झाले आहेत. आरमोरी तालुकास्तरावरील संकलन केंद्रात पेपर क्रमांक १ साठी १२१, पेपर क्रमांक २ साठी ४७ व पेपर क्रमांक १ व २ साठी ५८ असे एकूण २२६ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती आहे. कुरखेडा तालुकास्तरावर पेपर क्रमांक १ साठी ९५, पेपर क्रमांक २ साठी ३० व दोन्ही पेपरसाठी १६ असे एकूण १४१ अर्ज तर देसाईगंज तालुकास्तरावरील केंद्रात पेपर क्रमांक १ साठी ४३, पेपर क्रमांक २ साठी १३ व पेपर क्रमांक १ व २ साठी १८ असे एकूण ७४ अर्ज प्राप्त झाले आहे. कोरची तालुकास्तरावरील केंद्रात पेपर क्रमांक १ साठी २८, पेपर क्रमांक २ साठी ७ व दोन्ही पेपरसाठी ४ असे एकूण ३९ अर्ज तर धानोरा तालुकास्तरावरील केंद्रात पेपर क्रमांक १ साठी ३५, पेपर क्रमांक २ साठी १३ व दोन्ही पेपरसाठी २ असे एकूण ५० अर्ज प्राप्त झाले आहेत.
चामोर्शी तालुकास्तरावरील केंद्रात पेपर क्रमांक १ साठी सर्वाधिक २३०, पेपर क्रमांक २ साठी ४९ व दोन्ही पेपरसाठी ६० असे एकूण ३३९ अर्ज प्राप्त झाले आहेत. मुलचेरा तालुकास्तरावरील केंद्रात पेपर क्रमांक १ साठी ४८, पेपर क्रमांक २ साठी ११ व दोन्ही पेपरसाठी ८ असे एकूण ६७ अर्ज प्राप्त झाले आहे. भामरागड तालुकास्तरावरील केंद्रात सर्वात कमी पेपर क्रमांक १ साठी ४, पेपर क्रमांक २ साठी ८ व दोन्ही पेपरसाठी ३ असे एकूण १५ अर्ज प्राप्त झाले आहेत. अहेरी तालुकास्तरावरील केंद्रात पेपर क्रमांक १ साठी ११३, पेपर क्रमांक २ साठी ६३ व दोन्ही पेपरसाठी ३६ असे एकूण २१२ अर्ज तर सिरोंचा तालुकास्तरावरील केंद्रात पेपर क्रमांक १ साठी २०, पेपर क्रमांक २ साठी ७ आणि दोन्ही पेपरसाठी १० असे एकूण ३७ अर्ज २० आॅक्टोबरपर्यंत प्राप्त झाले असल्याची माहिती आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा टीईटी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची संख्या अत्यल्प राहणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: 2,200 applications for TE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.