सिरोंचात २१७ बालके कुपोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 05:00 IST2020-04-26T05:00:00+5:302020-04-26T05:00:17+5:30
राज्यात कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी राज्यशासन व आरोग्य यंत्रणा विविध उपाययोजना आखत आहेत. स्वयंसेवी संस्थांमार्फत कुपोषण निर्मूलनाचे काम गडचिरोली जिल्ह्यात सुरू आहे. सर्च संस्थेचे संचालक डॉ.अभय बंग व डॉ.राणी बंग यांच्यामार्फतीने शासन कुपोषण निर्मूलनासाठी विविध उपक्रम राबवित आहेत.

सिरोंचात २१७ बालके कुपोषित
कौसर खान ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : गर्भवती महिलेची प्रकृती चांगली असल्यास सुदृढ बाळ जन्माला येतो. मात्र सिरोंचा तालुक्यात आरोग्य सोयीसुविधेचा अभाव, गरीबी, अज्ञानता, जनजागृतीचा अभाव आदी कारणांमुळे कुपोषित बालकांची समस्या कायम आहे. जानेवारी २०२० च्या आकडेवारीनुसार २१७ कुपोषित बालके आढळून आली.
राज्यात कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी राज्यशासन व आरोग्य यंत्रणा विविध उपाययोजना आखत आहेत. स्वयंसेवी संस्थांमार्फत कुपोषण निर्मूलनाचे काम गडचिरोली जिल्ह्यात सुरू आहे. सर्च संस्थेचे संचालक डॉ.अभय बंग व डॉ.राणी बंग यांच्यामार्फतीने शासन कुपोषण निर्मूलनासाठी विविध उपक्रम राबवित आहेत. केंद्र व राज्य सरकारचा कोट्यवधी रुपयांचा निधी कुपोषण निर्मूलनाच्या कामावर आजवर खर्च झाला. मात्र जिल्ह्याच्या आदिवासी व जंगलव्याप्त भागातील बालकांच्या कुपोषणाची समस्या कमी झाली नाही. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून आरोग्य सेवेचे कार्य केले जाते. सिरोंचा तालुक्यात अंकिसा, मोयाबीन पेठा, टेकडाताला व झिंगानूर आदी चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. जानेवारी २०२० च्या अहवालानुसार या चारही प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत एकूण २१७ बालके कुपोषित आढळून आली. यामध्ये अंकिसा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ११० बालकांचा समावेश आहे. यामध्ये ५९ मुले व ५१ मुलींचा समावेश आहे. मोयाबीनपेठा आरोग्य केंद्राअंतर्गत ३ मुले व ९ मुली अशी एकूण १२, टेकडाताला प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ५२ मुले व २८ मुली अशा एकूण ८० बालके कुपोषित आढळून आली. झिंगानूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत १५ बालके कुपोषित आढळून आली. यामध्ये ११ मुले व ४ मुलींचा समावेश आहे. सदर कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले असून सॅम व मॅम या प्रकारात आढळलेली बालके आहेत. वजनानुसार साधारण ग्रेडमध्ये चारही पीएचसीअंतर्गत एकूण २८ बालके आहेत. मध्यम स्वरूपाचे ११३ तर तीव्र कुपोषित म्हणून ७६ बालके आढळून आली. शासनाकडून अनुदान प्राप्त होऊनही कुपोषणाची समस्या पूर्णत: सुटली नाही.
चारही केंद्रात डॉक्टरांची पदे रिक्त
सिरोंचा तालुक्यातील अंकिसा, मोयाबिनपेठा, टेकडाताला व झिंगानूर या चार प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांची प्रत्येकी एक पद रिक्त आहे. विशेष म्हणजे गट ‘ब’ श्रेणीचे वैद्यकीय अधिकारी येथे नाही. याशिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांचीही पदे रिक्त आहेत. तालुक्यात प्राथमिक आरोग्य पथक आहे. या पथकामध्ये सुद्धा डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. परिचारिका, परिचर व इतर पदे प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त असल्याने याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे. आरोग्य यंत्रणेतील काही अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहून सेवा देत नाही. त्यामुळे औषधोपचार वेळेवर मिळत नसल्याची तालुक्यातील नागरिकांची ओरड आहे. कुपोषण निर्मूलनासाठी रिक्तपदे भरून आरोग्य यंत्रणा बळकट करण्याची गरज आहे.