२० हजार टीसीएम पाणी साठा उपलब्ध

By Admin | Updated: August 4, 2016 01:25 IST2016-08-04T01:25:09+5:302016-08-04T01:25:09+5:30

भाजपप्रणित राज्य सरकारने सन २०१५-१६ या आर्थिक वर्षापासून महत्त्वकांक्षी योजना म्हणून हाती घेतलेल्या

20 thousand TCM water storage available | २० हजार टीसीएम पाणी साठा उपलब्ध

२० हजार टीसीएम पाणी साठा उपलब्ध

जलयुक्त शिवारचे यश : तीन हजारांहून अधिक कामे पूर्ण; जलयुक्त गावे जाहीर होणार
गडचिरोली : भाजपप्रणित राज्य सरकारने सन २०१५-१६ या आर्थिक वर्षापासून महत्त्वकांक्षी योजना म्हणून हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१५-१६ या वर्षात १५२ गावात जलसंधारणाची तब्बल ३ हजार ४२३ कामे पूर्ण करण्यात आली. या कामातून एकूण २०५२६.४० टीसीएम पाणीसाठा उपलब्ध झाला असून ९३५६.३४ हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.
पावसाचे पाणी व्यर्थ जाऊ नये, पावसाळ्यातील पाण्याचा अपव्यय टाळून पाणीसाठ्याची क्षमता अधिकाधिक वाढविणे, सिंचन क्षेत्र वाढविणे तसेच टंचाईमुक्त महाराष्ट्र घडविणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सन २०१५-१६ या वर्षात १५२ गावांची निवड करण्यात आली व अभियानाच्या आढाव्यात या गावांचा समावेश करण्यात आला. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कृषी विभाग, जिल्हा परिषद (मनरेगा), वन विभाग, जि.प. सिंचाई, लघुसिंचन व पाटबंधारे चंद्रपूर विभागाच्या वतीने एकूण ३ हजार ४२३ कामे पूर्ण करण्यात आली. १६७ कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली आहे.
पूर्ण करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांमध्ये मजगीचे ७९७, भात खाचर ९, माती नाला बांध ४३, माती नाला दुरूस्तीचे ३४, सिमेंट नाला बांध ५२, सिमेंट नाला बंधारा २२९, शेततळे ८४४, बोडी दुरूस्ती नुतनीकरणाचे ५४६, गाळ काढण्याची ९२, वन तलाव ४, खोदतळे ४०२, सीसीटी २२६, मामा तलाव दुरूस्तीचे ३८, गावतलाव दुरूस्तीचे ५, कालवे दुरूस्तीचे तीन कामे पूर्ण करण्यात आली. साठवण बंधारा दुरूस्तीचे २७, कोल्हापुरी बंधारा निर्मितीचे ४३, साठवण बंधारातून गाळ काढण्याबाबतचे ३६, मामा तलावातील गाळ काढण्याचे ६२, सिंचन विहीर निर्मितीचे ८१ कामे पूर्ण करण्यात आले. शेततळे व इतर कामातून गतवर्षी शेतकऱ्यांनी उन्हाळी धानपीक घेतले. तसेच भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतले. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सिंचन सुविधा निर्माण झाल्याने पुढील वर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

निर्माण झालेला पाणीसाठा
मजगीच्या ७९७ कामातून ६०१७.३५ टीसीएम, ४३ माती नाला बांधकामातून ५१६ टीसीएम, सिमेंट नाला बांधकामातून ७८० टीसीएम, ८४४ शेततळ्याच्या कामातून ३७०६.८५ टीसीएम, बोडी नुतनीकरणातून ५८९६.८० टीसीएम, खोदतळ्यातून १७६५.५८, मामा तलाव दुरूस्तीतून १९० टीसीएम, कोल्हापुरी बंधारा दुरूस्तीतून १३५ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला असून जलयुक्त शिवारच्या पूर्ण झालेल्या कामातून जिल्हाभरात ९३५६.३४ हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यात दुष्काळ स्थिती निर्माण होणार नाही.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार अंतर्गत झालेल्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी ए. एस. आर. यांनी घेतला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे उपस्थित होते. यावेळी जलयुक्त शिवार अंतर्गत गतवर्षी १५२ गावात विविध कामे घेण्यात आली. यंदाही १६९ गावात जलसंधारणाची अनेक कामे होणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांनी दिली. जलयुक्त शिवार कामातून सिंचन क्षेत्र वाढले असून भूजल पातळी वाढत आहे. जलयुक्त शिवारमधून निर्माण झालेल्या पाणीसाठ्याची अद्यावत गणना करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी नायक यांनी दिले.

 

Web Title: 20 thousand TCM water storage available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.