२० हजार बॅग तेंदूपत्ता संकलन
By Admin | Updated: May 23, 2015 01:54 IST2015-05-23T01:54:21+5:302015-05-23T01:54:21+5:30
पेसा अंतर्गत येत असलेल्या गावांमधून १६ हजार २७८ व पेसा क्षेत्राबाहेरच्या युनिटमधून ३ हजार ७३९ असे एकूण सुमारे २० हजार १७ बॅग तेंदूपत्ता संकलन १७ मे पर्यंत करण्यात आले आहे.

२० हजार बॅग तेंदूपत्ता संकलन
गडचिरोली : पेसा अंतर्गत येत असलेल्या गावांमधून १६ हजार २७८ व पेसा क्षेत्राबाहेरच्या युनिटमधून ३ हजार ७३९ असे एकूण सुमारे २० हजार १७ बॅग तेंदूपत्ता संकलन १७ मे पर्यंत करण्यात आले आहे.
राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार पेसा अंतर्गत येत असलेल्या गावांना तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार देण्यात आले आहे. मात्र तेंदूपत्ता संकलन व त्याची विक्रीही अत्यंत किचकट बाब असून त्यासाठी लाखो रूपयांच्या भांडवलाची गरज असल्याने काही गावांनी वन विभागाचे सहकार्य घेतले आहे. या गावातील १३८ युनिटपैकी १२८ युनिटचा लिलाव झाला. १० युनिटची विक्रीच झाली नाही. या युनिटमधून २०१५ च्या हंगामात २ लाख ११ हजार ९४० बॅग तेंदूपत्ता संकलन करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मागील १५ दिवसांपासून संकलनास सुरूवात झाली आहे. या युनिटमध्ये १७ मे पर्यंत १६ हजार २७८ बॅग तेंदूपत्ता संकलन करण्यात आला आहे. वन विभागाने ठरविलेल्या उद्दिष्टाच्या हे प्रमाण ७.६८ टक्के एवढे आहे.
पेसा क्षेत्राबाहेर असलेल्या युनिटमध्ये पूर्वी प्रमाणेच वन विभाग स्वत: तेंदूपत्ता संकलन करीत आहे. पेसा क्षेत्राबाहेरचे एकूण ४३ युनिट विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी केवळ १० युनिटची विक्री झाली. या युनिटमधून १६ हजार ३९० बॅग तेंदूपत्ता संकलनाचे उद्दिष्ट वन विभागाने ठेवले होते. त्यापैकी ३ हजार ७३९ बॅग तेंदूपत्ता संकलन झाले आहे. हे प्रमाण उद्दिष्टाच्या २२.८१ टक्के एवढे आहे. मागील आठवड्यापासून तेंदूपत्ता संकलनाला जोर आला असल्याने या आठवड्यात सर्वाधिक तेंदूपत्ता संकलन होण्याची शक्यता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली असून या आठवड्यात जवळपास ६० ते ७० टक्के उद्दिष्ट गाठता येणार आहे. (नगर प्रतिनिधी)
प्रती शेकडा २३७ रूपये ५० पैसे दर
शासनाने तेंदूपत्ता संकलनाचे दर मागील वर्षीच्या तुलनेत १२ रूपये ५० पैसे एवढे वाढविले आहे. मागील वर्षी प्रती शेकडा २२५ रूपये भाव दिला जात होता. यावर्षी वाढ करून २३७ रूपये ५० पैसे एवढा भाव दिला जाणार आहे. हा शासकीय दर असला तरी जास्तीत जास्त प्रमाणात तेंदूपत्ता संकलन व्हावे यासाठी तेंदूपत्ता कंत्राटदार यापेक्षा जास्त दर देत आहेत.