जिल्ह्यातील २० ग्रामपंचायती हागणदारीमुक्त
By Admin | Updated: December 5, 2015 09:07 IST2015-12-05T09:07:29+5:302015-12-05T09:07:29+5:30
२०१५-१६ या वर्षात जिल्ह्यातील २० गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. याबद्दल गडचिरोली येथील गोंडवन कलादालनात शुक्रवारी ...

जिल्ह्यातील २० ग्रामपंचायती हागणदारीमुक्त
सरपंच व सचिवांचा सत्कार : गडचिरोलीत आत्मसन्मान कार्यशाळा; मान्यवरांनी केले मार्गदर्शन
गडचिरोली : २०१५-१६ या वर्षात जिल्ह्यातील २० गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. याबद्दल गडचिरोली येथील गोंडवन कलादालनात शुक्रवारी आयोजित आत्मसन्मान कार्यशाळेदरम्यान संबंधित ग्राम पंचायतीचे सरपंच, सचिव व संवर्ग विकास अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, परिक्षाविधीन आयएफएस अधिकारी टी. ब्युला एलिल मनी, जि. प. सदस्य केसरी उसेंडी, पद्माकर मानकर, कारू रापंजी, सुनंदा आतला, सुखमा जांगधुर्वे, होमराज आलाम आदी उपस्थित होते.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद गडचिरोली विभागाच्या वतीने जास्तीत गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. याअंतर्गत जास्तीत जास्त शौचालय बांधकामासाठी निधी वितरित केला जात आहे.
२०१५-१६ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील लेखा, आरमोरी तालुक्यातील कोचबी, देऊळगाव, बोरीचक, वैरागड, मुलचेरा तालुक्यातील लगाम, देसाईगंज तालुक्यातील एकलपूर, पोटगाव, गडचिरोली तालुक्यातील मुडझा, काटली, अडपल्ली, गोगाव, सिरोंचा तालुक्यातील वडधम, कुरखेडा तालुक्यातील अंगारा, पलसगड, कोरची तालुक्यातील जांभळी, बेडगाव, बेतकाठी, सातपुती, अहेरी तालुक्यातील महागाव खुर्द या २० ग्राम पंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. यानिमित्त तेथील सरपंच, सचिव व बीडीओ यांचा सत्कार करण्यात आला. यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील ३९ गावे हागणदारीमुक्त झाली होती. यावर्षीचे २० असे एकूण जिल्ह्यातील ५९ गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. संचालन गडचिरोलीचे पंचायत विस्तार अधिकारी रतन शेंडे तर आभार जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अमित माणूसमारे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सदानंद धुडसे, केवळ करकाडे, नितीन भोले, एकनाथ सेलोटे, प्रफुल मडावी, शैलेश धवट, नादीया शेख यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)
सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठीही प्रयत्न
केंद्र शासनाने निर्मल ग्राम पुरस्कार देणे यावर्षीपासून बंद केले आहे. त्यामुळे या गावांना आत्मसन्मान पुरस्कार देऊन जिल्हास्तरावर सन्मानित करण्यात येत आहे. जी गावे हागणदारीमुक्त झाली आहेत, अशा ५९ गावांमध्ये आता सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यामुळे या गावात पूर्णपणे स्वच्छता राहण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण घातले गेल्यामुळे पर्यावरण संतुलीत राहण्यासही फारमोठी मदत होणार आहे.