१९६ कंत्राटी कर्मचारी कार्यमुक्त होणार
By Admin | Updated: April 3, 2016 03:50 IST2016-04-03T03:50:42+5:302016-04-03T03:50:42+5:30
कुष्ठ रूग्णांचा शोध घेऊन त्यांच्या औषधोपचाराची जबाबदारी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे.

१९६ कंत्राटी कर्मचारी कार्यमुक्त होणार
कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम : सहायक संचालकांचे अधिकाऱ्यांना निर्देश
देसाईगंज : कुष्ठ रूग्णांचा शोध घेऊन त्यांच्या औषधोपचाराची जबाबदारी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. असे असतानाही मात्र कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत कार्यरत राज्यातील एकूण १९६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना ३१ मार्च रोजी गुरूवारला कार्यमुक्तीचे निर्देश देण्यात आले आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागणार आहे.
यापूर्वी महात्मा गांधी जयंतीपासून कुष्ठरोगदिन आणि पंधरवडा साजरा केला जात असताना, केंद्र सरकारने कुष्ठरोगाचे निर्मुलन करण्याऐवजी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते. परंतु केंद्रीय खत व रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या मध्यस्तीतून पुन्हा वाढीव आदेश देण्यात आले होते. मात्र गुरूवारी ३१ मार्च रोजी कंत्राटी कर्मचाऱ्यांचा भारमुक्तीचा आदेश धडकल्याने खळबळ माजली आहे.
राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कुष्ठरोग निर्मुलनाच्या कामासाठी एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत ११ महिन्यांसाठी नियुक्ती देण्यात आली. हे कर्मचारी जिल्हा व तालुकास्तरावर काम करीत आहेत. दरम्यान पुणे येथील सहायक संचालक (कुष्ठरोग व क्षयरोग) यांनी प्रत्येक जिल्ह्यातील सहायक संचालक (कुष्ठरोग) यांना पत्र पाठवून ३१ मार्चपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिले. केंद्र सरकारने कुष्ठरोग निर्मुलनासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली. मात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे अनुदान मंजूर केले नसल्याचे सहायक संचालकाच्या पत्रात नमूद आहे.
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक कुष्ठ रूग्ण आहे. शासनामार्फत २ ते १७ आॅक्टोबर या कालावधीत कुष्ठरोग जनजागृती मोहीम राबविण्यात आली. तसेच १९ ते ३१ आॅक्टोबर व ३० जानेवारी ते १६ फेब्रुवारीदरम्यान कुष्ठ रूग्णांचे सर्वेक्षण करण्यात आले. या कालावधीत कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून कुष्ठ रूग्ण शोधण्यास मदत झाली. तसेच या सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणात कुष्ठ रूग्ण आढळून आले. (तालुका प्रतिनिधी)