१.८९ लाखांचा गुटखा जप्त
By Admin | Updated: September 27, 2014 23:14 IST2014-09-27T23:14:44+5:302014-09-27T23:14:44+5:30
एकलपूर मार्गावर पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी पाठलाग करून शहरातील सिंधू भवनाजवळ गुटखा व सुगंधित तंबाखू घेऊन जाणारे वाहन पकडल्याची घटना शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.

१.८९ लाखांचा गुटखा जप्त
आरोपीला अटक : पोलिसांनी वाहन पकडले
देसाईगंज : एकलपूर मार्गावर पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी पाठलाग करून शहरातील सिंधू भवनाजवळ गुटखा व सुगंधित तंबाखू घेऊन जाणारे वाहन पकडल्याची घटना शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. या वाहनातून पोलिसांनी १ लाख ८९ हजार २०० रूपये किमतीचे ९ पेट्या सुगंधित तंबाखू जप्त केला. आरोपी जितेंद्र राजकुमार टहलानी (२७) रा. सिंधू कॉलनी देसाईगंज याला पोलिसांनी अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, कुरखेडा मार्गावरून वाहनाने मोठ्या प्रमाणात गुटख्याची आयात शहरात होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कुरखेडा-एकलपूर मार्गावर रात्रीच्या सुमारास नाकाबंदी केली. दरम्यान, रात्री ९.३० वाजताच्या सुमारास एमएच-३४-एए-५६४१ हे वाहन गुटखा घेऊन शहरात येत होते. दरम्यान, पोलिसांनी वाहनाला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहनचालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने वाहन चालवून पसार होण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचा संशय अधिक बळावल्यानंतर पोलिसांनी सदर वाहनाचा पाठलाग केला. सिंधू भवनासमोर वाहनाला पकडले. या वाहनाची तपासणी केली असता, या वाहनात ९ पेट्या सुगंधित तंबाखू आढळून आला. पोलिसांनी या वाहनातील १ लाख ८९ हजार २०० रूपये किमतीचा ९ पेट्या सुगंधित तंबाखू जप्त केला. या प्रकरणातील आरोपी जितेंद्र राजकुमार टहलानी (२७) याचेवर भादंविचे कलम २७३, १८८, सहकलम २६ (२)/(४), ३०(२-अ) तसेच अन्न व सुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक यमगर यांनी केली. विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त करून पोलिसांनी काल रात्री आरोपीला अटक केली. मात्र शनिवारी ठाण्यातूनच आरोपीची जमानत करण्यात आली. (वार्ताहर)