जि.प.लावणार १.८२ लाख रोपटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2017 01:23 IST2017-07-01T01:23:32+5:302017-07-01T01:23:32+5:30
शासनाच्या महत्त्वाकांक्षी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या वतीने यावर्षी १ लाख ८२ हजार २७८ रोपटे लावण्यात येणार

जि.प.लावणार १.८२ लाख रोपटी
जगवण्याचाही संकल्प : ग्रामपंचायती आणि शाळांची घेणार मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शासनाच्या महत्त्वाकांक्षी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या वतीने यावर्षी १ लाख ८२ हजार २७८ रोपटे लावण्यात येणार असल्याची माहिती जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.
यावेळी आ.डॉ.देवराव होळी, जि.प.उपाध्यक्ष अजय कंकडलावार, भाजपच्या पं.दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी समारोह समितीचे जिल्हा प्रमुख प्रकाश अर्जुनवार आदी उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना अध्यक्ष भांडेकर यांनी सांगितले की, जि.प.कडून लावल्या जात असलेल्या रोपट्यांपैकी १ लाख ६६ हजार ३४८ रोपटे ग्रामपंचायतींच्या मार्फत तर १४ हजार ७३० रोपटे जि.प.च्या प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या परिसरात लावले जाणार आहेत. त्यासाठीचा खर्च त्या-त्या स्तरावर ग्रामपंचायती व शाळांकडून केला जाणार आहे. याशिवाय जिल्हा परिषदेच्या आवारात १२० रोपटे, पंचायत समित्यांच्या कार्यालय परिसरात ३५० आणि जि.प.च्या ग्रामीण रस्त्यांवर ७२० रोपटे लावले जाणार आहेत. वृक्षारोपणानंतर ती जगली पाहिजे यासाठी ट्री-गार्डसह योग्य ती व्यवस्था केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्यावर्षी शासनाच्या याच योजनेतून लावलेली ४० टक्के झाडे जीवंत असल्याचे यावेळी आ.होळी यांनी सांगितले.
भाजप लावणार २ लाख रोपटी
शासनाच्या उपक्रमाला हातभार म्हणून भाजपच्या वतीने पं.दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त जिल्ह्यात २ लाख रोपटी लावण्याचा संकल्प केला असल्याचे आ.डॉ.देवराव होळी यांनी सांगितले. २ ते ८ जुलैपर्यंत केल्या जाणाऱ्या या वृक्षारोपणात संपूर्ण खर्च लोकसहभागातून होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. २ ते ८ जुलैदरम्यान खासदार-आमदारांपासून तर जि.प.-पं.स.सदस्यांपर्यंत कधी कुठे कार्यक्रम होणार याचे नियोजन करण्यात आले आहे.