छत्रपतीच्या स्मारकासाठी १८ नद्यांचे पाणी व १० किल्ल्यांची माती रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2016 01:00 IST2016-12-23T01:00:18+5:302016-12-23T01:00:18+5:30
मुंबई जवळच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारले जाणार आहे.

छत्रपतीच्या स्मारकासाठी १८ नद्यांचे पाणी व १० किल्ल्यांची माती रवाना
पालकमंत्र्यांची माहिती : २४ डिसेंबरला अरबी समुद्रात भूमिपूजन
गडचिरोली : मुंबई जवळच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारले जाणार आहे. या स्मारकाचे जल व भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २४ डिसेंबर रोजी होत आहे. या स्मारकासाठी गडचिरोली जिल्ह्यातील १८ नद्यांचे पाणी व १० किल्ल्यांची माती रवाना करण्यात आली आहे. या सोहळ्याला जिल्ह्यातील जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले आहे.
राजभवनापासून जवळच असणाऱ्या समुद्रातील बेटावर जगातील सर्वांत उंच असे स्मारक बांधण्यात येणार आहे. हा कार्यक्रम अधिक संस्मरणीय ठरावा, यासाठी राज्यातील ७० हून अधिक नद्यांचे पाणी व गड, किल्ल्यांची पवित्र माती पाठविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारकाच्या कामास गती दिली. केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, नौदल पश्चिम विभाग, तटरक्षक दल, सागरी किनारा अधिनियम, मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालिका, बेस्ट, मुंबई पोर्ट ट्रस्ट, बीएनएचएस इंडिया, मत्स्य व्यवसाय विभाग, राष्ट्रीय सुरक्षा दल दिल्ली, भारतीय विमान पत्तन प्राधिकरण या विभागांचे नाहरकत प्रमाणपत्र शासनाने घेतले आहेत. महाराष्ट्राची पताका जगभरात फडकविणाऱ्या छत्रपती शिवाजी महाजारांना महाराष्ट्राच्या वतीने हे अनोखे वंदन असेल. महाराष्ट्राच्या तेजस्वी व गौरवशाली इतिहासाचे प्रतिबिंब या स्मारकाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये २ हजार ३०० कोटी रूपयांची कामे प्रस्तावित आहेत. यापूर्वी १९२ मीटर उंचीचा पुतळा उभारण्याचे नियोजन होते. आता या पुतळ्याची उंची २१० मीटर इतकी वाढविण्यात आली आहे. या स्मारकात शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारीत कला, दालन, प्रदर्शन, गॅलरी, महाराजांच्या चरित्रावर आधारीत पुस्तकांचे सूसज्ज वाचनालय, प्रेक्षक गॅलरी, उद्यान, हेलिपॅड राहणार आहे. ३६ महिन्याच्या आत स्मारक पूर्ण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिली. पत्रकार परिषदेला आमदार डॉ. देवराव होळी, अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड उपस्थित होते.(नगर प्रतिनिधी)