१८ लाख ९३ हजारांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2016 01:25 IST2016-08-01T01:25:51+5:302016-08-01T01:25:51+5:30
महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १ एप्रिल ते ३० जून २०१६ या तीन महिन्यांच्या कालावधीत...

१८ लाख ९३ हजारांचा दंड वसूल
तीन महिन्यांत : रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक
गडचिरोली : महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १ एप्रिल ते ३० जून २०१६ या तीन महिन्यांच्या कालावधीत विविध ठिकाणी धाडसत्र राबवून रेती व इतर गौण खनिजाचे एकूण २२६ प्रकरणे निकाली काढले. या प्रकरणातून संबंधित कंत्राटदाराकडून एकूण १८ लाख ९३ हजार ५५० रूपयांचा दंड वसूल केला.
गडचिरोली उपविभागातील गडचिरोली व धानोरा तालुक्यात महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ५९ प्रकरणातून ४ लाख ५८ हजार ७०० रूपयांचा दंड तीन महिन्यांच्या कालावधीत वसूल केला. चामोर्शी व मुलचेरा तालुक्याचा समावेश असलेल्या चामोर्शी उपविभागाने ४१ प्रकरणातून ६ लाख २२ हजार ८५० रूपयांचा दंड वसूल केला. देसाईगंज व आरमोरी तालुक्याचा समावेश असलेल्या देसाईगंज उपविभागाने ४८ प्रकरणातून ३ लाख ३५ हजार २०० तर कुरखेडा व कोरची तालुक्याचा समावेश असलेल्या कुरखेडा उपविभागात महसूल विभाच्या अधिकाऱ्यांनी १२ प्रकरणातून ७७ हजार २०० रूपयांचा दंड वसूल केला. अहेरी व सिरोंचा तालुक्याचा समावेश असलेल्या अहेरी उपविभागाने ५६ प्रकरणातून एकूण ३ लाख १८ हजार ६०० रूपयांचा दंड वसूल केला. एटापल्ली व भामरागड तालुक्याचा समावेश असलेल्या एटापल्ली उपविभागातील महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तीन महिन्यांच्या कालावधीत धाडसत्र राबवून एकूण १० प्रकरणातून ८१ हजार रूपयांचा दंड संबंधित कंत्राटदाराकडून वसूल केला. महसूल विभागाच्या या कारवाईमुळे जिल्हाभरातील रेती माफियांचे धाबे दणाणले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)