17 Punitive action against tobacco and kharra sellers | १७ तंबाखू व खर्रा विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई

१७ तंबाखू व खर्रा विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई

ठळक मुद्देआठ गावांतून ५० हजारांचा मुद्देमाल केला नष्ट; कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुक्तीपथचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : तालुक्यातील नऊ गावातील किराणा दुकानांमध्ये तसेच घरी लपून छपून खर्रा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या १७ जणांकडून १८ हजाराचा दंड वसूल केला. मुक्तिपथ गाव संघटन, सरपंच, तलाठी व तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांनी आठवडाभरात या कारवाया केल्या.
कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी जिल्ह्यात कुठेही खर्रा व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री न करण्याचे जिल्हा प्रशासनाने निर्देश दिले आहे. त्याचबरोबर अन्न पदार्थ विक्री होत असलेल्या दुकानातून तंबाखूजन्य पदार्थ विकणे हा कायद्याने गुन्हा आहे. पण हा कायदा आणि जिल्हा प्रशासनाचे निर्देश पायदळी तुडवत गावांमध्ये खर्रा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत आहे. त्यामुळे हा प्रकार थांबण्यासाठी मुक्तिपथने गावांमध्ये स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने दंडात्मक कारवाईचा धडाका सुरू केला आहे.
या आठवड्यात नऊ गावांमध्ये ही दंडात्मक कारवाई करण्यात आली. गेदा गावात किराणा दुकानांची झडती घेतली असता ३ दुकानांमध्ये खर्रा व तंबाखूजन्य पदार्थ सापडले. हा सर्व साठा नष्ट करून तीनही दुकानमालकांवर प्रत्येकी १ हजार रुपये दंड ग्रा.पं ने वसूल केला. कसनसूर, एकरा बुज व बुर्गी येथीलही प्रत्येकी तीन दुकानमालकांसह एकूण ९ दुकानमालकांवर तंबाखूजन्य पदार्थ विक्रीप्रकरणी प्रत्येकी हजार रुपये दंड ग्रा. प ने आकारला. अशाच प्रकारे जारावंडी, टेमली, उडेरा, डोद्दी येथील तंबाखू विक्रेत्यावर ग्रामपंचायत व महसूल प्रशासनाने प्रत्येकी हजार रुपये तर उमरगुंडाच्या एका विक्रेत्यावर २ हजार रुपये दंड आकाराला. एकूण १८ हजारांचा दंड या ग्राम पंचायतींनी वसूल केला. या सर्वांना दंडात्मक कारवाईची रितसर पावतीही देण्यात आली. हा निधी ग्रामपंचायतच्या खात्यात जमा करण्यात आला. या कारवायांमध्ये सापडलेला जवळपास ५० हजारांचा मुद्देमाल प्रशासनाने नष्ट केला.
कोरोनाचा संसर्ग थुंकीवाटे पसरण्याचा धोका जास्त असतो. खर्रा व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणारे सतत थुंकत असतात. त्यातच आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असणाºया गडचिरोली जिल्ह्यात कोरोना आजाराचे रुग्ण सापडले असून त्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे संसर्गाचा प्रसार टाळण्यासाठी लोकांनी अशा पदार्थांचे सेवन आणि दुकानदारांनी विक्री पूर्णपणे थांबविण्याचे आवाहन मुक्तिपथने केले.

मोहफूल दारू विक्रेते घाबरले
मुक्तीपथ व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने गेल्या १५ दिवसाच्या कालावधीत शेतशिवार व जंगल परिसरातील मोहफूल दारूअड्ड्यावर धाड टाकून मोहसडवा व इतर मुद्देमाल नष्ट करण्यात आला. सदर कारवाईमुळे मोहफूल दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

शहरातील १२ विक्रेत्यांवर कारवाई
शुक्रवारी एटापल्ली शहरातील किराणा दुकानांची पोलीस निरीक्षक सुरेश मदने, मुक्तिपथने झडती घेतली. यावेळी १२ दुकानांमध्ये खर्रा व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. या सर्व दुकानांतून १५ हजाराचा तंबाखूजन्य पदार्थ जप्त करून होळी केली. विक्रेत्यांवर कोटपा कायद्यान्वे कारवाई केली.

Web Title: 17 Punitive action against tobacco and kharra sellers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.