१७९४ कुटुंबांना शौचालय
By Admin | Updated: December 25, 2015 02:02 IST2015-12-25T02:02:27+5:302015-12-25T02:02:27+5:30
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शासनाने गडचिरोली पालिकेला शहरात तीन हजार शौचालय निर्मितीचे उद्दिष्ट दिले आहे.

१७९४ कुटुंबांना शौचालय
तीन हजार शौचालय निर्मितीचे उद्दिष्ट : पालिकेकडे १ हजार ३९७ अर्ज प्राप्त
दिलीप दहेलकर गडचिरोली
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शासनाने गडचिरोली पालिकेला शहरात तीन हजार शौचालय निर्मितीचे उद्दिष्ट दिले आहे. गडचिरोली शहरात अद्यापही १ हजार ७९४ कुटुंबांकडे शौचालय नाही. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात शहरातील १ हजार ७९४ कुटुंबांना शासनाच्या अनुदानातून शौचालय मिळणार आहे. शौचालय योजनेसाठी आतापर्यंत नगर पालिकेकडे १ हजार ३९७ लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. सदर योजनेची पालिकेच्या वतीने युद्धपातळीवर अंमलबजावणी सुरू झाली आहे.
सर्व शहरांमध्ये नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, याकरिता शहरांना स्वच्छता आणि शहरांमधील सर्व नागरिकांना शौचालयाची सुविधा उपलब्ध करून दिले जात आहे. स्वच्छतेचे सदर ध्येय गाठण्यासाठी केंद्र शासनाकडून स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. शहरात राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानातून पात्र लाभार्थी कुटुंबास वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी अनुदान देऊन शौचालय तयार करवून घेतले जात आहेत. त्यानुसार गडचिरोली नगर पालिकेने आॅगस्ट महिन्यापासून या योजनेच्या कार्यवाहीस सुरुवात केली आहे. प्रत्येकाकडे वैयक्तिक शौचालय असावे जेणेकरून शहरी नागरिकांना शासनाच्या सर्व सुविधा मिळाव्या तसेच शहरातील वातावरणही स्वच्छ असावे, हा उद्देश ठेवून स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शौचालय बांधकामाची मोहीम राबविली जात आहे.
नगर पालिका प्रशासनाकडून पहिल्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम मिळालेल्या लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकाम सुरू केले आहे. तर अद्यापही शहरातील अनेक भागातील शौचालय नसलेले कुटुंब प्रमुख नगर पालिकेच्या कार्यालयात जाऊन अर्ज सादर करीत आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने तीन महिन्यांपूर्वी शहरात शौचालय असलेल्या व नसलेल्या कुटुंबाविषयी सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये शहरातील गोकुलनगर, विवेकानंदनगर, रामनगर, लांजेडा, इंदिरानगर, विसापूर, विसापूर टोली व कॉम्पलेक्स भागातील जवळपास पावणे दोन हजार कुटुंबांकडे शौचालय नसल्याचे दिसून आले. या सर्व कुटुंबांना आता योजनेंतर्गत शौचालय मिळणार आहे.