रानडुकरांच्या शिकारप्रकरणी कसारीतील १६ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 22:24 IST2019-05-21T22:24:06+5:302019-05-21T22:24:42+5:30
तारांमध्ये विजेचा प्रवाह सोडून वन्यजीवांची शिकार करणाºया कसारी येथील दुधराम आत्माराम मडावी याच्यासह इतर १५ जणांना वन विभागाने अटक केली. मडावी याने शिकार केली तर इतर लोकांनी ते मांस विकत घेतल्याने त्यांनाही आरोपी करण्यात आले.

रानडुकरांच्या शिकारप्रकरणी कसारीतील १६ जणांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव चोप : तारांमध्ये विजेचा प्रवाह सोडून वन्यजीवांची शिकार करणाऱ्या कसारी येथील दुधराम आत्माराम मडावी याच्यासह इतर १५ जणांना वन विभागाने अटक केली. मडावी याने शिकार केली तर इतर लोकांनी ते मांस विकत घेतल्याने त्यांनाही आरोपी करण्यात आले.
कसारी येथील दुधराम आत्माराम मडावी हा त्याच्या शेतात तारांत विद्युत प्रवाह सोडून वन्यजीवांची शिकार करतो, अशी गोपनिय माहिती वनविभागाला मिळाली होती. त्याआधारे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी १९ मे रोजी मडावी याच्या शेतात जाऊन तपासणी केली. तिथे तार आढळून आले. शिकारीबाबत विचारले असता, त्याने सुरूवातीला नकार दिला. मात्र वन विभागाच्या कर्मचाºयांना मडावीवर संशय असल्याने त्याची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने आपण वन्यजीवांची शिकार करीत असल्याचे मान्य केले. पुन्हा त्याच्या शेताची तपासणी केली असता, तणसाच्या ढिगात तीन रानडुकरांचे मुंडके व एक रानकुत्रा कुजलेल्या स्थितीत आढळून आला.
वन विभागाच्या कर्मचाºयांनी अधिक चौकशी केल्यानंतर कसारी येथील ज्या नागरिकांना मांस विकले, अशा १५ व्यक्तींची नावे मडावी याने सांगितली. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांनी त्या १५ नागरिकांनाही अटक केली. मडावीसह इतर १५ व्यक्तींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने इतर १५ आरोपींची जामिनावर सुटका केली तर मडावी याला तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. सदर कारवाई उपविभागीय वनाधिकारी एस.जी. कैदलवार, वन परिक्षेत्राधिकारी आर. एम. शिंदे यांच्यासह वन कर्मचाऱ्यांनी केली.
अधिकची माहिती मिळविण्याचा प्रयत्न
आरोपी दुधराम मडावी याच्याकडून शिकारीविषयची अधिकची माहिती मिळविण्याचा प्रयत्न वन विभागाचे कर्मचारी वनकोठडीदरम्यान करणार आहेत. त्यादृष्टीने तपासाची चक्रे फिरविली जाणार आहेत.