बांबू विक्रीतून १६ ग्रामसभा लखपती

By Admin | Updated: September 19, 2016 01:48 IST2016-09-19T01:48:14+5:302016-09-19T01:48:14+5:30

केंद्र शासनाच्या सामुहिक वनहक्क कायदा २००६ नुसार काही निवडक वनोपजाची तोड, विक्री व व्यवस्थापनाचा अधिकार ग्रामसभांना मिळाला.

16 gram sabha lakhpati from bamboo sale | बांबू विक्रीतून १६ ग्रामसभा लखपती

बांबू विक्रीतून १६ ग्रामसभा लखपती

सामूहिक वनहक्क : १० कोटी २० लाख रूपये तिजोरीत; ग्रामस्थांना मिळाला रोजगार
दिलीप दहेलकर  गडचिरोली
केंद्र शासनाच्या सामुहिक वनहक्क कायदा २००६ नुसार काही निवडक वनोपजाची तोड, विक्री व व्यवस्थापनाचा अधिकार ग्रामसभांना मिळाला. या अधिकाराचा वापर करून गडचिरोली जिल्ह्यातील तीन वन विभागातील २५ ग्रामसभांनी बांबू विक्री व व्यवस्थापनाचे काम केले. यातून सन २०१५-१६ या वर्षात १६ ग्रामसभांना १० कोटी २० लाख ५९ हजार १४५ रूपयांचे उत्पन्न मिळाले असून यातून सदर ग्रामसभा लखपती बनल्या आहेत.
सामुहिक वनहक्क कायद्यानुसार सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात उन्हाळ्यात २५ ग्रामसभांनी गावालगतच्या हद्दितील बांबूची तोड, विक्री व व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडली. यातून भामरागड, वडसा व गडचिरोली वन विभागातील १६ ग्रामसभांना लाखो रूपयाचे उत्पन्न मिळाले आहे.
भामरागड वन विभागांतर्गत कसनसूर, ताडगाव, भामरागड या वनपरिक्षेत्रातील गुमडी म., बेजूर, गोपनार, होडरी, हितापाडी व बंगाडी या सहा ग्रामसभेने बांबूचे व्यवस्थापन केले. यापैकी गुमडी म. वगळता इतर पाच ग्रामसभांना लांब बांबू विक्रीतून सात लाख व बांबू बंडल विक्रीतून १ कोटी १४ लाख ७९ हजार ८६० रूपयांचे उत्पन्न मिळाले. भामरागड वन विभागातील बेडगाव व पुराडा परिक्षेत्रांतर्गत मुरकुंटी, झंकारगोंदी, गोडरी, पडियालजोग, मयालघाट, लक्ष्मीपूर, डोंगरगाव या सात ग्रामसभांनी बांबूंचे व्यवस्थापन केले. यापैकी गोडरी, लक्ष्मीपूर ग्रामसभा वगळता इतर पाच ग्रामसभांना एकूण २ कोटी ९९ लाख २५ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले. गडचिरोली वन विभागांतर्गत तूळमेळ, गट्टेपायली, मक्केपायली, येडमपायली खु., पदाबोरीया, गोडलवाही, जांभळीझोरा, ताहाकापार, मेटेजांगदा, गठानयेली, मर्केगाव व तोडे या १२ ग्रामसभांनी सामुहिक वनहक्क कायद्यानुसार बांबूंची तोड, विक्री व व्यवस्थापन केले.
यातून सात ग्रामसभांना ३ कोटी ६१ लाख ६४ हजार ३१५ रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. बांबू विक्रीतून मिळालेली सदर रक्कम संबंधित ग्रामसभेच्या बँक खात्यात जमा आहे. बांबू व्यवस्थापनाच्या माध्यमातून संबंधित ग्रामसभेच्या गावांमधील नागरिकांना उन्हाळ्यात रोजगार प्राप्त झाला. एकूणच सामुहिक वन कायद्याच्या माध्यमातून बांबू व्यवस्थापनातून ग्रामसभा आर्थिक दृष्ट्या सक्षम होत असून गावाचा विकास होत आहे.

अशी झाली बांबू बंडल्सची विक्री
गडचिरोली वनवृत्त कार्यालयांतर्गत भामरागड, वडसा व गडचिरोली या तीन वन विभागात सन २०१५-१६ या वर्षात ग्रामसभांनी ४ लाख ७८ हजार २६५ लांब बांबूची विक्री केली तसेच ८ लाख ४१ हजार ६४६ बांबू बंडलची विक्री केली. या व्यवहारासाठी वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ग्रामसभांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.

नऊ ग्रामसभांची माहिती वनवृत्त कार्यालयाला अप्राप्त
सामूहिक वनहक्क कायद्यानुसार गडचिरोली वनवृत्तातील भामरागड, वडसा, गडचिरोली या तीन वन विभागातील २५ ग्रामसभांनी सन २०१५-१६ या वर्षात बांबूंची तोड, विक्री व व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडली. सर्वच ग्रामसभांनी बांबूची योग्य विल्हेवाट लावून आर्थिक उत्पन्न मिळविले. मात्र गडचिरोली वनवृत्त कार्यालयाला वनकर्मचाऱ्यांमार्फत १६ ग्रामसभांच्या आर्थिक मिळकतीची माहिती प्राप्त झाली आहे. उर्वरित नऊ ग्रामसभांची माहिती अद्यापही गडचिरोली वनवृत्त कार्यालयाकडे पोहोचली नसल्याची माहिती आहे. गडचिरोली वनवृत्तातर्फे गेल्या अनेक महिन्यांपासून बांबू विक्री व्यवस्थापनाची माहिती वनकर्मचाऱ्यांकडून मागविली जात आहे. मात्र अनेक ग्रामसभा माहिती देण्यास दिरंगाई करीत आहेत.

Web Title: 16 gram sabha lakhpati from bamboo sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.