१५५ गावांचा संपर्क तुटला
By Admin | Updated: September 6, 2014 23:45 IST2014-09-06T23:45:14+5:302014-09-06T23:45:14+5:30
शुक्रवारच्या रात्रीपासून जिल्हाभर संततधार पाऊस सुरू असल्याने तसेच छत्तीसगड राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी वाढल्याने गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी, भामरागड

१५५ गावांचा संपर्क तुटला
भामरागडची दूरध्वनी सेवाही ठप्प : अहेरी, भामरागडात पूरस्थिती बिकट
गडचिरोली : शुक्रवारच्या रात्रीपासून जिल्हाभर संततधार पाऊस सुरू असल्याने तसेच छत्तीसगड राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी वाढल्याने गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी, भामरागड तालुक्यातील पूर परिस्थिती बिकट झाली आहे. या दोन तालुक्यातील १५५ गावांचा संपर्क तुटलेला आहे. या तालुक्यातील अनेक पुलावर पाणी चढल्याने वाहतुकही ठप्प झाली आहे.
आलापल्ली-भामरागड मार्गावरील चंद्रा नाल्याजवळ पाणी चढल्याने हा मार्ग शुक्रवारपासून बंद झाला आहे. भामरागड गावाच्या सभोवताल पाण्याने वेढा पडला असून अनेक कुटुंबांना सुरक्षीत जागी हलविण्यात आले आहे. जवळजवळ १०० वर अधिक गावांचा तालुका व जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे. शनिवारी दुपारी १ वाजतानंतर भामरागडची दूरध्वनी व भ्रमणध्वनी सेवाही ठप्प झाली आहे. अहेरीतील जुन्या मध्यवर्ती बँकेसमोरील १० ते १५ घरांमध्ये तसेच आझाद वार्ड व बाजार परिसरातील ३० ते ४० घरांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच अहेरी तालुक्यात अहेरीनजिकच्या गडअहेरी नाल्याच्या पुलावरून १० फूट पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. पूर परिस्थितीमुळे देवलमरी, चेरपल्ली, व्यंकटापूर, इंदाराम, पुसूकपल्ली, बामणी, अमनपल्ली आदीसह ४० गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. नाल्यावर पाणी असल्यामुळे अहेरी-आवलमरी बसफेरी रद्द करण्यात आली आहे. जिमलगट्टानजिकच्या देचलीपेठा परिसरातही मुसळधार पावसामुळे १५ ते २० गाव संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. क्रिष्टापूर, डोडा आणि लिंदा या नाल्यांना पूर आला असून या परिसरातील गावांचा संपर्क तालुका मुख्यालयाशी तुटलेला आहे. जिल्ह्यात शनिवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात २२१.६ मिमी पाऊस झाला. गडचिरोली तालुक्यात ४४ मिमी, एटापल्ली १६.८, भामरागड १५३ मिमी पाऊस झाला.