वादळाने १५२ घरांची पडझड
By Admin | Updated: May 16, 2017 00:41 IST2017-05-16T00:41:08+5:302017-05-16T00:41:08+5:30
चामोर्शी तालुक्यातील घोट परिसराला रविवारी रात्री २ वाजता वादळाचा तडाखा बसला.

वादळाने १५२ घरांची पडझड
२ लाख ८० हजारांचे नुकसान : रेगडी व विकासपल्ली गावांना बसला फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
घोट : चामोर्शी तालुक्यातील घोट परिसराला रविवारी रात्री २ वाजता वादळाचा तडाखा बसला. यामध्ये रेगडी व विकासपल्लीतील सुमारे १५२ घरांची पडझड झाली आहे. महसूल विभागाच्या मार्फत करण्यात आलेल्या पंचनाम्यात नागरिकांच्या घरांचे २ लाख ८० हजार रूपयांचे नुकसान झाले असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.
रविवारी रात्री २ वाजताच्या सुमारास रेगडी व विकासपल्ली परिसरात जोरदार वादळाला सुरूवात झाली. वादळामुळे अनेक नागरिकांच्या घरावरील छत उडाले. काहींच्या घरावरील टिनाचे पत्रे लाकडी छत घेऊनच उडाले. वादळामुळे आंबा पिकाचेही मोठे नुकसान झाले. रेगडी येथील १३७ नागरिकांच्या घरांची पडझड झाली आहे. यामध्ये २ लाख ४५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. विकासपल्लीतील १५ घरांची पडझड झाली आहे. यामध्ये ३५ हजार रूपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. शनिवारी रात्री १२ वाजेपासून तर सकाळी ६ वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे अनेकांची झोप झाली नाही. अशीच स्थिती रविवारीही वादळ वारा सुरू झाल्यानंतर वीज पुरवठा खंडीत झाला. घरांचे नुकसान झाल्याने रविवारच्या रात्री सुध्दा झोप झाली नाही. रेगडी येथील राजे धर्मराव हायस्कूल व एका खासगी कॉन्व्हेंटचे छत उडाले आहे. रस्त्यावर झाडे पडल्याने मार्गावरील वाहतूक खंडीत झाली होती.
वादळामुळे गीला हलामी, सुधाकर हलामी, विठ्ठल पावे, श्यामराव पावे, गणेश पावे, सुरेश हलामी, देवाजी वड्डे, लहू गोभाडी, बाबुराव गोभाडी, बालाजी नरोटे यांच्या घरांचे नुकसान झाले. घरावरील छत उडाल्याने अनेकांना बेघर होण्याची पाळी आली आहे. खरीपपूर्व मशागतीच्या कामांना सुरूवात झाली आहे. शेतकऱ्यांनी पै-पै गोळा करून खरीप हंगामासाठी पैसा जमवून ठेवला होता. तो पैसा आता घसर दुरूस्तीवर खर्च करण्याची पाळी आली आहे. ज्यांच्याकडे पैसा नाही, त्यांची अडचण वाढली आहे. मदत देण्याची मागणी होत आहे.
आमदारांनी केली पाहणी
रेगडी व विकासपल्ली येथील घरांचे नुकसान झाले असल्याची माहिती प्राप्त होताच आमदार डॉ. देवराव होळी यांनी रेगडी व विकासपल्लीला सकाळीच भेट दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य नामदेव सोनटक्के, घोटचे वन परिक्षेत्राधिकारी शेखर तबपुरे, महसूल मंडळ अधिकारी एस. व्ही. सरते, तलाठी व्ही. आर. आलाम, घोटचे अतकरे, बालापुरे, गव्हारे, झूलगंटीवार, हेमंत उपाध्ये, पांडुरंग कांबळे, रमेश अधिकारी उपस्थित होते. तत्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश आमदारांनी कर्मचाऱ्यांना दिले. शासनाकडून मदत मिळण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन आमदारांनी दिले.