१५२ कोटींच्या आराखड्यास मंजुरी

By Admin | Updated: October 15, 2016 01:35 IST2016-10-15T01:35:07+5:302016-10-15T01:35:07+5:30

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत १५२

152 crores draft approved | १५२ कोटींच्या आराखड्यास मंजुरी

१५२ कोटींच्या आराखड्यास मंजुरी

कृषी क्षेत्राला प्राधान्य : नरेगातून १० तालुक्यांतील ३७७ ग्रा. पं. मध्ये १२ हजारांवर कामे होणार
गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत १५२ कोटी ७७ लाख रूपयांच्या अतिरिक्त नियोजन आराखड्यास सोमवारी मंजुरी प्रदान करण्यात आली. या आराखड्यानुसार जिल्ह्याच्या दहा तालुक्यात रोहयोतून एकूण १२ हजार १६९ कामे होणार आहेत. शासनाच्या ११ कलमी कार्यक्रमाअंतर्गत सन २०१६-१७ या चालू वर्षात सदर कामे करण्यात येणार आहेत. सदर आराखड्यात कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्यात आले असून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात घेण्यात आली आहेत.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना २ फेब्रुवारी २००६ पासून राज्याच्या १२ जिल्ह्यात लागू करण्यात आली असून यात गडचिरोली जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी सुरू असून ग्रामपंचायतस्तरावर ग्रामसभा घेऊन कामाची निवड करणे, कुटुंबाची नोंदणी, जॉब कार्ड वाटपाची कार्यवाही करण्यात आलेली आहे. नोंदणी केलेल्या मजुरांना मागणीनुसार कामे उपलब्ध करून देण्यासाठी रोहयोच्या नियोजनात विविध प्रकारची कामे घेण्यात आली आहेत. रोजगार हमी योजनेच्या सन २०१६-१७ च्या अतिरिक्त नियोजन आराखड्यानुसार जिल्ह्याच्या १० तालुक्यातील ३७७ ग्रामपंचायतीच्या गावांमध्ये कामे घेण्यात आली आहेत. यामध्ये अहेरी तालुक्यातील ३९ ग्रामपंचायती, भामरागड २०, चामोर्शी ७६, धानोरा ६१, एटापल्ली ३१, गडचिरोली ५१, कोरची ३, कुरखेडा ४४, आरमोरी ३३ व देसाईगंज तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
अहेरी तालुक्याच्या ग्रामपंचायतीमध्ये २ हजार ५०२, भामरागड ४८०, चामोर्शी १ हजार २९४, धानोरा २ हजार ५१, एटापल्ली ३०४, गडचिरोली १ हजार १७२, कोरची ४१, कुरखेडा ५६, आरमोरी २ हजार ९५३ व देसाईगंज तालुक्यात १ हजार ३०० कामे विविध गावांमध्ये रोहयोतून करण्यात येणार आहे. सदर अतिरिक्त नियोजन आराखड्यानुसार १० तालुक्यातील १२ हजार १६९ कामातून ५०.१२७ लाख मनुष्यदिवस इतकी रोजगार निर्मिती होणार आहे. शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ४ आॅगस्ट २०१६ च्या परिपत्रकानुसार सुधारित अतिरिक्त ११ कलमी कार्यक्रमात प्रस्तावित नियोजन आराखड्यात कामे समाविष्ट करणे गरजेचे आहे व याला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळणे आवश्यक असते. त्यानुसार सदर अतिरिक्त नियोजन आराखडा १० आॅक्टोबर रोजी सोमवारच्या गडचिरोली जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला. हा आराखडा जि. प. अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे यांनी मंजूर केला. या आराखड्यातील अतिरिक्त कामे मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागामार्फत कार्यवाही सुरू असून या कामांना नोव्हेंबर महिन्यात प्रारंभ होणार आहे. सदर आराखड्यात समाविष्ट असलेली ८ हजार ८९२ कामे ५० टक्के वाट्यानुसार ग्रामपंचायतस्तरावर तर ३ हजार २७७ कामे यंत्रणास्तरावर करण्यात येणार आहे. या कामांच्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो मजुरांना रोजगार उपलब्ध होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे होणार काम
४रोजगार हमी योजनेच्या सन २०१६-१७ च्या अतिरिक्त आराखड्यात स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यांची एकूण ५८ कामे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये अहेरीत सर्वाधिक २७ कामे होणार आहेत. याशिवाय गुरांच्या गोठ्यांचे २९४ कामे मंजूर करण्यात आली तर कुकुटपालन व्यवसायाला बळकटी देण्यासाठी शेड उभारण्याचे १३८ कामे घेण्यात आली आहेत.

आराखड्यातील ठळक कामे
४शासनाच्या ११ कलमी कार्यक्रमाच्या अनुषंगाने सन २०१६-१७ वर्षाकरिता मंजूर करण्यात आलेल्या नियोजन आराखड्यात अहेरी व भामरागड तालुक्यातील बोडींचे ११८ कामे अहेरी, आरमोरी, भामरागड, चामोर्शी, देसाईगंज व गडचिरोली या सात तालुक्यातील १ हजार १५६ कामे शेततळ्यांची समाविष्ट करण्यात आली आहेत. या आराखड्यानुसार पाच तालुक्यात सिंचन विहिरींची ८०१ कामे घेण्यात आली आहेत.

४रोजगार हमी योजनेच्या अतिरिक्त आराखड्यानुसार पाच तालुक्यात एकूण एक हजार पाच वैयक्तिक शौचालय मंजूर करण्यात आले आहेत. त्यानुसार आरमोरी तालुक्यात ५१७, भामरागड ४४, चामोर्शी ५९, देसाईगंज ८२ व गडचिरोली तालुक्यात ३०३ कामे शौचालयाची होणार आहेत. सदर कामे मार्गी लागल्यानंतर संबंधित गावांची गोदरीमुक्तीकडे वाटचाल सुरू होणार आहे.

Web Title: 152 crores draft approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.