१५० रिकामे भूखंड बनले कचऱ्याचे केंद्र

By Admin | Updated: September 23, 2015 05:14 IST2015-09-23T05:14:34+5:302015-09-23T05:14:34+5:30

४५ हजार लोकसंख्या असलेल्या गडचिरोली शहराचा प्रचंड प्रमाणात नव्याने विस्तार होत आहे. शहराचे झपाट्याने नागरीकरण

150 empty plots became a trash center | १५० रिकामे भूखंड बनले कचऱ्याचे केंद्र

१५० रिकामे भूखंड बनले कचऱ्याचे केंद्र

दिलीप दहेलकर ल्ल गडचिरोली
४५ हजार लोकसंख्या असलेल्या गडचिरोली शहराचा प्रचंड प्रमाणात नव्याने विस्तार होत आहे. शहराचे झपाट्याने नागरीकरण झाल्याने मोठ्या प्रमाणावर जमिनीची खरेदी-विक्रीही प्लॉटसाठी केली जात आहे. मात्र जवळजवळ १५० पेक्षा अधिक भूखंड हे गेल्या अनेक वर्षांपासून शहरात रिकामे पडून आहेत. हे भूखंड कचऱ्याचे डम्पर झोन व सांडपाणी जमा झाल्याने डुकरांचे वस्तीस्थान झाले आहे. यामुळे शहरात डेंग्यू व इतर आजार गेल्या दोन वर्षांपासून झपाट्याने वाढत आहे.
नगर पालिका प्रशासन रिकाम्या भूखंडावरील कचऱ्याची उचल, सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून आहे. त्यामुळे गडचिरोली शहराचे आरोग्यही धोक्यात आले आहे. गडचिरोली नगर पालिकेअंतर्गत कॉम्प्लेक्सपासून लांझेडा, गोकुलनगर ते सर्वोदय वार्डपासून विवेकानंद नगरपर्यंतचा परिसर आहे. या शहरात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राहणारे अनेक नागरिक व नोकरदार भूखंड घर बांधकामासाठी खरेदी करीत आहेत. गडचिरोली शहरात जमिनीचे भाव प्रचंड प्रमाणात वाढले असून अनेकांनी १० ते १५ वर्षांपूर्वी घेऊन ठेवलेल्या भूखंडावर घराचे बांधकाम केलेले नाही. असे रिकामे पडलेले भूखंड गडचिरोली नगर पालिकेकडे नोंद करून त्याचा वार्षिक कर भरणे आवश्यक आहे. या कराच्या माध्यमातून पालिका शहर विकासाला चालना देऊ शकते. परंतु या भूखंड मालकांकडून कर भरण्याबाबतची कार्यवाही वर्षानुवर्षे होत नाही. भूखंड विक्रीला काढल्यास त्यावेळी कर भरल्या जातो.
भूखंड बऱ्याच वर्षांपासून रिकामा राहत असल्याने काही भूखंडावर परिसरातील नागरिकांनी आपले सांडपाणीही सोडून दिले आहे. त्यात डुकरे व इतर जनावरे राजरोसपणे ठिय्या देऊन आहेत. अशा भूखंड मालकांना पालिकेने नोटीस बजावून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची गरज असताना नगर पालिका प्रशासनाने अद्याप एकाही भूखंड मालकावर कारवाई केलेली नाही. सांडपाण्याची ही वस्तीस्थानसुध्दा नष्ट केलेली नाही. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून शहरात आठपेक्षा अधिक नागरिकांचा डेंग्यूसारख्या गंभीर आजाराने मृत्यू झाला. हिवताप मलेरियासारख्या साथीचे रोग या रिकाम्या भूखंडावरील गटारांमुळे शहरात होत आहेत. नगर पालिका प्रशासन या प्रश्नाकडे पूर्णपणे डोळेझाक करून आहे.

पालिकेकडे यंत्रणा नाही
सूत्रांच्या माहितीनुसार शहरातील विविध वार्डात जवळपास ५० अकृषक तर १०० कृषक असे एकूण १५० भूखंड रिकामे पडले आहेत. याच्यावर घराची निर्मिती न झाल्याने परिसरातील लोक या मोकळ्या जागेवर कचरा आणून टाकतात. नगर परिषदेच्या कचराकुंडीशिवाय या भूखंडावरचा कचरा जमा करण्यासाठी पालिकेची कोणतीही यंत्रणा येत नाही.

बाहेरगावचे अनेक भूखंडधारक
गडचिरोली शहरात रिकाम्या असलेल्या भूखंडाचे अनेक मालक हे जिल्ह्यातील तालुका मुख्यालय व मोठ्या गावांमध्ये राहणारे आहेत. तर काही मालकांनी गुंतवणूक म्हणून गडचिरोली शहरात जागा घेऊन ठेवल्या आहे व ते आपले कुटुंब घेऊन नागपुरात स्थायिक झाले आहे. त्यांना या जागा विकायच्याही नाहीत.

Web Title: 150 empty plots became a trash center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.