जिल्ह्यात १५० डॉक्टर ‘बोगस’

By Admin | Updated: August 15, 2016 00:42 IST2016-08-15T00:42:39+5:302016-08-15T00:42:39+5:30

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या शासकीय वैद्यकीय सेवेत काम करण्यासाठी मोठ्या शहरातील डॉक्टर तयार होत नाही.

150 doctor 'bogas' in the district | जिल्ह्यात १५० डॉक्टर ‘बोगस’

जिल्ह्यात १५० डॉक्टर ‘बोगस’

रूग्णांचा जीव धोक्यात : आरोग्य विभागातर्फे यादी तयार
दिलीप दहेलकर गडचिरोली
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या शासकीय वैद्यकीय सेवेत काम करण्यासाठी मोठ्या शहरातील डॉक्टर तयार होत नाही. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांसह सर्वच रूग्णालयात डॉक्टरांची अनेक पदे रिक्त आहेत. परिणामी शासनाची मान्यता नसलेल्या अनेक बोगस डॉक्टरांकडून वैद्यकीय व्यवसाय सुरू आहे. जि.प.च्या आरोग्य विभागाने अलिकडेच प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर सर्वेक्षण करून बोगस डॉक्टरांची यादी तयार केली आहे. त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात एकूण १५० बोगस डॉक्टर वैद्यकीय व्यवसायात गुंतले आहेत.
कोणत्याही जिल्ह्यात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी संबंधित डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सीलची मान्यता असणे आवश्यक आहे. एमबीबीएस, बीएएमएस, बीडीएस, बीएचएमएस, बीयूएमएस, डीएचएमएस व डीएचबी या पदवीधर व प्रमाणपत्रधारक डॉक्टरांना वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सीलतर्फे मान्यता दिली जाते. या संदर्भात राज्याच्या आरोग्य विभागाने परिपत्रक जारी केले आहे.
आरएमपी, बीईएमएस, डीईएमएस व इतर प्रमाणपत्र व पदवी प्राप्त केलेल्या डॉक्टरांना वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सीलतर्फे मान्यता दिली जात नाही. गडचिरोली जिल्ह्यात बीएएमएस, आरएमपी, डीईएमएस व इतर प्रमाणपत्र व पदवी प्राप्त केलेले दीडशे बोगस डॉक्टर आहेत. याशिवाय वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या काही डॉक्टरांकडे कुठल्याही प्रकारची पदवी व प्रमाणपत्र नाही. मात्र गडचिरोली जिल्ह्यात डॉक्टरांची वाणवा असल्यामुळे अशा डॉक्टरांचाही व्यवसाय जोरात सुरू आहे. बोगस डॉक्टरांच्या औषधोपचाराने रूग्णाला प्रसंगी धोकाही होऊ शकतो.

भामरागड, कोरचीतही बोगस डॉक्टर
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सर्वेक्षण करून महाराष्ट्र मेडिकल कौन्सीलची मान्यता नसलेल्या बोगस डॉक्टरांची यादी नुकतीच तयार केली आहे. आरोग्य विभागाच्या आकडीवारीनुसार भामरागड व कोरची तालुक्यात एकही बोगस डॉक्टर नाही. मात्र प्रत्यक्षात या दोन्ही तालुक्यात अनेक बोगस डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचे दिसून येते. या तालुक्यात बारकाईने सर्वेक्षण केल्यास निश्चितच बोगस डॉक्टरांची माहिती मिळणे शक्य आहे.

कंपाऊंडरही बनले डॉक्टर
ग्रामीण व दुर्गम भागातील काही युवक रोजगारासाठी एखाद्या मोठ्या डॉक्टरांकडे कंपाऊंडर म्हणून काम करतात. पाच ते सहा वर्षाचा तेथील अनुभव मिळाल्यानंतर ते आपल्या गाव परिसरात जाऊन वैद्यकीय व्यवसाय सुरू करतात. गडचिरोली जिल्ह्यातही अनेक कंपाऊंडर असलेले युवक आता डॉक्टर बनले आहेत.

Web Title: 150 doctor 'bogas' in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.