नगराध्यक्षपदासाठी पाच ठिकाणी १५ उमेदवारांचे १८ अर्ज दाखल

By Admin | Updated: November 22, 2015 01:34 IST2015-11-22T01:34:31+5:302015-11-22T01:34:31+5:30

गडचिरोली जिल्ह्यात दोन टप्प्यात नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक घेतली जाणार आहे.

15 nominations for 15 candidates for five municipal elections | नगराध्यक्षपदासाठी पाच ठिकाणी १५ उमेदवारांचे १८ अर्ज दाखल

नगराध्यक्षपदासाठी पाच ठिकाणी १५ उमेदवारांचे १८ अर्ज दाखल

सर्वाधिक अर्ज एटापल्लीत : रेखा मोहुर्लेचा अर्ज बाद
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दोन टप्प्यात नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक घेतली जाणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यात कोरची, धानोरा, मुलचेरा, एटापल्ली, अहेरी या पाच नगर पंचायतीसाठी नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक होईल. नामांकन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया शनिवारपासून सुरू झाली. पाच नगर पंचायतीत नगराध्यक्ष पदासाठी १५ उमेदवारांचे १८ नामांकन पत्र दाखल करण्यात आले. एटापल्ली येथे अपक्ष नगरसेविका रेखा मोहुर्ले यांचा उमेदवारी अर्ज सुचक व अनुमोदक एकच आल्याने रद्द ठरला आहे.
अहेरी येथील नगराध्यक्ष पद नागरिकाचा मागास प्रवर्ग (महिला) साठी राखीव आहे. याकरिता तीन नामांकन पत्र दाखल करण्यात आले आहे. भाजपतर्फे हर्षा रवींद्र ठाकरे, प्राजक्ता सचिन पेदापल्लीवार तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्चना श्रीनिवास विरगोनवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
धानोरा येथील नगराध्यक्ष पद नागरिकाचा मागास प्रवर्ग (महिला) साठी राखीव आहे. येथे नगराध्यक्ष पदासाठी ललित बरच्छा गटातर्फे वर्षा महेश चिमुरकर तर भाजपच्या वतीने लिना साईनाथ साळवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
मुलचेरा येथील नगराध्यक्ष पद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असून येथे दोन उमेदवारांचे तीन अर्ज दाखल करण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुभाष शामराव आत्राम यांनी दोन तर भाजपतर्फे दिलीप बाबुराव आत्राम यांनी अर्ज दाखल केले आहे.
कोरची येथे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. येथे शिवसेना भाजपच्या वतीने नसरूद्दीन भामानी यांनी अर्ज दाखल केला तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतर्फे शामलाल मडावी (काँग्रेस) व कोरची नगर विकास आघाडीच्या हिरा राऊत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
एटापल्लीचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असून येथे सरिता प्रसादराव राजकोंडावार (राकाँ), निर्मला जयेंद्र कोंडभत्तुलवार (भाजपा), सुनिता मोहन चांदेकर (भाजपा), रेखा गजानन मोहुर्ले (अपक्ष), भारती मणिराम इष्टाम (काँग्रेस) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. निर्मला कोंडभत्तुलवार व सुनिता चांदेकर यांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले आहे. येथे एकूण पाच उमेदवारांचे सात अर्ज दाखल झाले आहे. रेखा गजानन मोहुर्ले या नगरसेविकेचा उमेदवारी अर्ज सुचक व अनुमोदक एकच आल्याने रद्द ठरविण्यात आल्याची माहिती पिठासीन अधिकारी शालिकराम पडघन यांनी लोकमतशी बोलताना दिली. २६ नोव्हेंबरला पाचही ठिकाणी उपाध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल होतील.

Web Title: 15 nominations for 15 candidates for five municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.