एटापल्लीत १५ नवीन टॉवर
By Admin | Updated: April 24, 2017 01:14 IST2017-04-24T01:14:46+5:302017-04-24T01:14:46+5:30
नक्षलग्रस्त भागात मोबाईल टॉवर, रस्ते, पूल बांधकामासाठी केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयाने डावीकडवी विचारसरणी ग्रस्त भागाला विशेष मदत करण्याचे धोरण अवलंबिले आहे.

एटापल्लीत १५ नवीन टॉवर
लवकरच होणार बांधकाम : केंद्राच्या गृहमंत्रालयातून निधी प्राप्त
एटापल्ली : नक्षलग्रस्त भागात मोबाईल टॉवर, रस्ते, पूल बांधकामासाठी केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयाने डावीकडवी विचारसरणी ग्रस्त भागाला विशेष मदत करण्याचे धोरण अवलंबिले आहे. या अंतर्गत एटापल्ली तालुक्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त भागात सुमारे १५ मोबाईल टॉवर मंजूर करण्यात आले आहेत.
नक्षलग्रस्त भागात प्रामुख्याने दळणवळणाची साधने अत्यंत मर्यादित आहेत. याचा फायदा नक्षली घेतात. एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहप्रकल्पाला नक्षल्यांचा विरोध आहे. ही बाब लक्षात घेऊन सुरजागड पहाडाच्या सभोवताल पोलीस ठाणे उभारले जात आहेत. त्याचबरोबर ज्या परिसरात आता नेटवर्कचेही जाळे उभारण्याचे काम केले जात आहे. केंद्राचे गृहमंत्रालय बीएसएनएलच्या मार्फतीने एटापल्ली तालुक्यातील भापडा, अलेंगा, पिपलीबुर्गी, जवेली, घोटसूर, मोडस्के, इतलनार, परसलगोंदी, दोडूर, गिलनगुंडा, गेद्दा, दोडी, रेकनार, बर्डी या ठिकाणी टॉवर उभारण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी निधी सुध्दा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे बीएसएनएलच्या वतीने जागा शोधण्याचे काम सुरू झाले आहे. काही ठिकाणी तर जागाही निश्चित झाली आहे. लवकरच संबंधित गावांमध्ये मोबाईल टॉवरचे बांधकाम केले जाणार आहे. १५ मोबाईल टॉवरची भर पडणार असल्याने ग्रामीण व दुर्गम भागातही कव्हरेज उपलब्ध होणार आहे. नागरिकांना सोयीसुविधा पुरवून तसेच दळणवळणाची साधने मजबूत करून नक्षल्यांना शह देण्याचा प्रयत्न शासनाकडून चालविला जात आहे. एटापल्ली तालुक्याबरोबरच भामरागड तालुक्यात पाच, अहेरीत पाच, कोरचीत चार व धानोरात चार टॉवर मंजूर झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)