चारचाकी वाहनांसह १५ लाखांची दारू पकडली
By Admin | Updated: July 30, 2016 01:50 IST2016-07-30T01:50:05+5:302016-07-30T01:50:05+5:30
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथून देसाईगंज मार्गे गडचिरोली जिल्ह्यात चारचाकी वाहनाने वाहतूक होत असलेली ....

चारचाकी वाहनांसह १५ लाखांची दारू पकडली
एक आरोपी फरार : लाखांदुरातून देसाईगंजमार्गे जिल्ह्यात होत होती दारूची वाहतूक
देसाईगंज : भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथून देसाईगंज मार्गे गडचिरोली जिल्ह्यात चारचाकी वाहनाने वाहतूक होत असलेली दोन वाहनासह १५ लाखांची दारू देसाईगंज पोलिसांनी मोठ्या शिताफीने शुक्रवारी पकडली.
देसाईगंजचे पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील यांना लाखांदूर-देसाईगंज मार्गावरून दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी सहकाऱ्यांसह शुक्रवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास लाखांदूर-देसाईगंज मार्गावर आमगाव जवळ पाळत ठेवली. दरम्यान लाखांदूरवरून एक स्कोडा व एक सुमो वाहन येत असल्याचे दिसले. हात देऊनही दोन्ही वाहने न थांबल्याने पोलिसांचा संशय बळावला. पुढे १०० मीटर अंतरावर उभे करून ठेवलेले ट्रक व ट्रॅक्टर आडवे लावून पोलिसांनी सदर दोन्ही वाहने थांबविण्यात यश मिळविले. दरम्यान सुमो वाहनाचा चालक पसार झाला. तर पोलिसांच्या हाती स्कोडा वाहनाचा चालक लागला. एमएच ४३ ए ९६८६ स्कोडा व एमएच २८ सी ३८२१ या सुमो वाहनातून प्रत्येकी ३० पेट्या देशी दारू आढळून आलीे. या दारूची किमत २ लाख १० हजार रूपये आहे. तर वाहनाची किमत १३ लाख रूपये आहे. पोलिसांनी असा एकूण १५ लाख रूपयांचा मुद्देमाल पकडला. या प्रकरणी आरोपी रमेश अजन्ना वेमुला (३६) रा. अंतरगाव ता. सावली जि. चंद्रपूर याला अटक करण्यात आली असून त्याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरा आरोपी फरार आहे.