उत्तर दाखल करण्यास १५ पर्यंत मुदत
By Admin | Updated: June 27, 2015 02:09 IST2015-06-27T02:09:31+5:302015-06-27T02:09:31+5:30
गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांना अपात्र ठरविण्याच्या याचिकेवर ...

उत्तर दाखल करण्यास १५ पर्यंत मुदत
उच्च न्यायालयात याचिका : होळी अपात्रता प्रकरण
गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांना अपात्र ठरविण्याच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वादी आणि प्रतिवादींना त्यांचे मुद्दे सादर करण्यासाठी १५ जुलै ही तारीख दिली आहे.
१५ आॅक्टोबर २०१४ रोजी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून डॉ. देवराव होळी हे भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आले. परंतु डॉ. होळी हे वैद्यकीय अधिकारी म्हणून शासकीय सेवेत होते आणि विजयी होण्याच्या क्षणापर्यंत त्यांचा राजीनामा शासनाने मंजूर केला नव्हता. तसेच डॉ. आ. होळी हे शासकीय सेवेत असताना शकुंतला मेमोरियल सोसायटीचे अध्यक्षही होते. या संस्थेने एनआरएचएम योजनेंतर्गत सिकलसेल कार्यक्रम राबविला होता. यासंबंधीची सुमारे ८ लाख ६८ हजार ३६३ रुपयांची रिकव्हरी या संस्थेकडे आहे. (अलीकडेच गडचिरोली न्यायालयाने आ.डॉ. होळी यांना शकुंतला मेमोरियल सोसायटीच्या खटल्यातून दोषमुक्त केले आहे) या दोन प्रमुख मुद्द्यावर डॉ.देवराव होळी यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करावे, अशा आशयाची याचिका डॉ.होळी यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार अॅड.नारायण जांभुळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयाने आ.डॉ.होळी यांना उत्तर सादर करण्यासाठी २६ जून ही अंतिम तारीख दिली होती. त्यानुसार आ.डॉ.होळी यांच्या वकिलांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात उत्तर सादर केले. यावेळी न्यायालयाने वादी आणि प्रतिवादींना त्यांचे मुद्दे मांडण्यासाठी १५ जुलै ही तारीख दिली आहे. या खटल्यामध्ये एकूण १६ प्रतिवादी होते.मात्र उच्च न्यायालयाने अन्य १५ प्रतिवादींना खटल्यातून वगळले असून, आता केवळ आ. डॉ. होळी हे एकमेव प्रतिवादी उरले आहेत, हे येथे उल्लेखनीय. आ.डॉ.होळी यांच्यातर्फे अॅड.खानझोडे, तर याचिकाकर्ते अॅड.नारायण जांभूळे यांच्यातर्फे अॅड. प्रदीप वाटोळे काम पाहत आहेत.