५०० कर्मचाऱ्यांसाठी १५ बाय २० फूटची ‘रेस्टरूम’
By Admin | Updated: March 6, 2015 01:31 IST2015-03-06T01:31:16+5:302015-03-06T01:31:16+5:30
गडचिरोली एसटी आगारातील ५०० वाहक व चालकांना विश्रांती करण्यासाठी बसस्थानकासमोरच १५ बाय २० फूट आकाराची खोली बनवून देण्यात आली आहे.

५०० कर्मचाऱ्यांसाठी १५ बाय २० फूटची ‘रेस्टरूम’
गडचिरोली : गडचिरोली एसटी आगारातील ५०० वाहक व चालकांना विश्रांती करण्यासाठी बसस्थानकासमोरच १५ बाय २० फूट आकाराची खोली बनवून देण्यात आली आहे. या खोलीमध्ये दोन पंख्यांच्या व्यतिरिक्त कोणतीही सुविधा नाही. नाव रेस्टरूम असले तरी या ठिकाणी एकही गादी नाही. अर्ध्यापेक्षा अधिक जागा कर्मचाऱ्यांच्या पेट्यांनी व्यापली आहे. त्यामुळे या खोलीत दहापेक्षा जास्त व्यक्ती बसूही शकत नाही. येथील अवस्थेविषयी तीव्र नाराजी व्यक्त करताना कर्मचाऱ्यांनी ही रेस्टरूम नसून खुराडा असल्याची प्रतिक्रिया देत या प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
गडचिरोली हे राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेला जिल्हा आहे. त्यामुळे गडचिरोली येथून राज्याच्या इतर भागात अनेक लांब पल्ल्याच्या बसेस सोडल्या जातात. त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या ये-जा करण्याची सुविधा गडचिरोली येथील एसटी आगार उपलब्ध करून देते.
गडचिरोली आगारात एकूण ९५ बसेस असून दररोज १०५ शेड्यूल आहेत. वाहक व चालक असे एकूण जवळपास ५०० कर्मचारी याठिकाणी कार्यरत आहेत. आगारामध्ये बस आल्यानंतर वाहक व चालकांना थोडीफार विश्रांती मिळावी, यासाठी बसस्थानकाच्या समोरच १५ बाय २० फूट आकाराची विश्रांती रूम बांधण्यात आली आहे. या विश्रांती रूममध्ये दोन पंखे व एक बल्ब वगळता इतर कोणत्याही सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही. दोन बाजुला दोन खिडक्या आहेत. मात्र या खिडक्यांचे तावदान पूर्णपणे फुटले आहे. छतावर टीन झाकण्यात आले असून टिनांच्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी सिलिंग लावण्यात आली आहे. मात्र सदर सिलिंग पूर्णपणे तुटली आहे. मागील कित्येक वर्षांपासून या खोलीला रंगरंगोटी करण्यात आली नाही. नावाने विश्रांती रूम असली तरी या ठिकाणी एकही गादी नाही. त्यामुळे पाच-दहा मिनिटासाठी कर्मचारी थोडा झोपू शकत नाही.
आगाराच्या अगदी समोर असल्याने दिवसभर या ठिकाणी बसचा आवाज व प्रवाशांचा गोंगाट सुरू राहतो. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास या खोलीत दिवसाही रात्रीप्रमाणे अंधार पसरतो. दिवसाढवळ्या डासांचा त्रास येथील कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. एकंदरीतच या खोलीची अवस्था बघितल्यास कोणताच व्यक्ती या खोलीला आराम करण्याची खोली संबोधणार नाही. तिची रचना कबुत्तरांच्या खुराड्याप्रमाणे करण्यात आली आहे.
येथील दुरवस्थेमुळे वाहक व चालक कमालीचे त्रस्त झाले आहेत. ज्या विभागासाठी आपले आयुष्य दावणीला लावले आहे, ते विभाग आराम करण्यासाठी एक चांगली खोली बांधून देत नसल्याबाबत तीव्र नापंसती व्यक्त केली. दुरवस्थेला त्रासून अनेक वाहक व चालक बसस्थानकातील ओट्यांवर थांबून पाच-दहा मिनीटे घालविणे पसंत करीत आहेत.
आगारातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी केवळ तीन शौचालये आहेत. या शौचालयांची स्वच्छता केली जात नसल्याने सर्वत्र घाण पसरली आहे.