१४ वर्षांत ७०० किमीचे नवीन रस्ते
By Admin | Updated: December 25, 2014 23:32 IST2014-12-25T23:32:26+5:302014-12-25T23:32:26+5:30
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत १४ वर्षांत ६९७.३७ किमीचे रस्ते बांधण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतांश रस्ते २५० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांपर्यंत पोहोचली आहेत.

१४ वर्षांत ७०० किमीचे नवीन रस्ते
गडचिरोली : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत १४ वर्षांत ६९७.३७ किमीचे रस्ते बांधण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतांश रस्ते २५० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांपर्यंत पोहोचली आहेत.
राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजना सुरू केली. या योजनेंतर्गत एक हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेली गावे बारमाही रस्त्याने जोडण्याचे धोरण अवलंबण्यात आले. या योजनेंतर्गत देशात लाखो किमींचे रस्ते बांधण्यात आले आहेत. जी गावे आजपर्यंत रस्त्यांअभावी विकासापासून वंचित होती. त्या गावांमध्ये विकासाची पहाट दिसून येत आहे. या योजनेचे सकारात्मक परिणाम केंद्र शासनाला दिसून आल्यानेच त्यानंतरच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने सुद्धा सदर योजना त्याच नावाने सुरू केली आहे. सध्या या योजनेचा दहावा टप्पा सुरू आहे.
योजनेच्या सुरूवातीपासून २००६ पर्यंत सदर योजना जिल्हा परिषदेच्या मार्फतीने राबविण्यात येत होती. त्यानंतर २००६-०७ मध्ये ग्रामीण रस्ते विकास संस्थेची स्थापना करून २००९ पासून स्वतंत्र कार्यकारी यंत्रणा निर्माण करण्यात आले. १० टप्प्यात २३३ कामे मंजूर करण्यात आली. त्यापैकी १८१ कामे पूर्ण झाली आहेत. ३८ कामे प्रगतिपथावर आहेत. या योजनेसाठी आजपर्यंत १९७ कोटी ७५ लाख रूपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत १,०७४.३२ किमीचे मार्ग मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी ६९७.३७ किमीचे रस्ते बांधून पूर्ण झाले आहेत.
गडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग नक्षल प्रभावित व जंगलाने व्यापला आहे. त्याचबरोबर काही गावांची लोकसंख्या १०० पेक्षाही कमी असून दोन गावांमधील अंतर चार ते पाच किमीपेक्षाही जास्त आहे. कमी लोकसंख्येसाठी रस्ते तयार करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला आर्थिक अडचणी येत असल्याने सदर विभाग या गावांमध्ये रस्ते निर्माण करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा अनुभव आल्यानंतर सदर योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा संपूर्ण निधी केंद्र सरकारकडून उपलब्ध करून देण्यात येते.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील शेकडो गावे रस्त्यांनी जोडली आहेत. त्यामुळे गावकऱ्यांना पावसाळ्याच्या दिवसातही मार्गक्रमण करण्यास सुकर झाला आहे. मात्र या रस्त्यांची आता बऱ्याच दिवसांपासून डागडुजी झाली नसल्याने सदर रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. (नगर प्रतिनिधी)