१४ विद्यार्थी अहेरीच्या रुग्णालयात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2017 01:32 IST2017-02-09T01:32:21+5:302017-02-09T01:32:21+5:30
अहेरी तालुका मुख्यालयापासून १६ किमी अंतरावर असलेल्या राजपूर पॅच येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या हंगामी

१४ विद्यार्थी अहेरीच्या रुग्णालयात दाखल
राजपूर पॅच येथील प्रकार : नाश्त्यानंतर पोटदुखीचा त्रास वाढला
अहेरी : अहेरी तालुका मुख्यालयापासून १६ किमी अंतरावर असलेल्या राजपूर पॅच येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या हंगामी वसतिगृहातील १४ विद्यार्थ्यांना सकाळच्या नाश्तानंतर पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याचा प्रकार बुधवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आला. पोटदुखीचा त्रास असलेल्या सर्वच १४ विद्यार्थ्यांना अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, याकरिता स्थानांतरित विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेअंतर्गत हंगामी वसतिगृहाची सुविधा करण्यात आली आहे. तालुक्यातील राजपूर पॅच येथील जिल्हा परिषद शाळेतील हंगामी वसतिगृहात ३६ विद्यार्थी निवासी राहून शिक्षण घेत आहेत. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी ८.३० वाजता विद्यार्थ्यांना आलुपोहाचा नाश्ता देण्यात आला. नाश्ता आटोपल्यानंतर विद्यार्थी वसतिगृहात परतले. त्यानंतर १०.३० वाजता शाळेत आले.
यावेळी विद्यार्थ्यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागला. यामध्ये पूनम मोहुर्ले (७), तन्वी दुर्योधन (१०), स्नेहा कंपेलवार (९), आकाश कोटरंगे (१०), निवेदिता बच्छर (११), वैष्णवी शेंडे (७), अक्षरा हजारे (९), अखिलेश निकुरे (१०), रजिया पठाण (११), सुवासिनी वसाके (११), आरती कुंदनवार (१०), प्रीती चटारे (१०), सोनाली रामगुंडेवार (१०), विष्णू गुरनुले यांचा समावेश आहे. सदर १४ विद्यार्थ्यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. लागलीच शाळेचे मुख्याध्यापक आर. बी. वडेट्टीवार यांनी आपल्या सहकारी शिक्षक व कर्मचाऱ्यांसह लगाम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका बोलावून अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, डॉ. संजय उमाटे, डॉ. ईशांत तुरकर, डॉ. अनुपमा बिश्वास, डॉ. पल्लवी रूपनारायण, डॉ. योगीता हरीणखेडे यांनी या सर्व विद्यार्थ्यांच्या पोटातील पाणी बाहेर काढले. शर्तीचे उपचार करून विद्यार्थ्यांची प्रकृती आटोक्यात आणली. सध्या २ मुले, १२ मुली असे एकूण १४ विद्यार्थी अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. शिक्षण विभागाचे अधिकारी या प्रकारावर लक्ष ठेवून आहेत. (तालुका प्रतिनिधी)
पोटदुखी नेमकी कशामुळे?
राजपूर पॅच येथील शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व उपसरपंच सुरेश गंगाधीरवार यांनी सांगितल्यानुसार, सदर जिल्हा परिषद शाळा परिसरात असलेल्या हातपंपातून गढूळ पाणी येत होते. याच पाण्याचा वापर शाळा तसेच गावकरी करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या नाश्तातून अथवा हातपंपाच्या गढूळ पाण्यामुळे विद्यार्थ्यांना पोटदुखीचा त्रास झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्यांना पोटदुखीचा त्रास कोणत्या कारणाने झाला, हा सध्या संशोधनाचा विषय आहे. सदर प्रकारामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चार वर्षांपूर्वी आरमोरी तालुक्याच्या लोहारा शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती.