१४ जोडपी विवाह बंधनात
By Admin | Updated: August 26, 2015 01:14 IST2015-08-26T01:14:32+5:302015-08-26T01:14:32+5:30
स्थानिक महसूल व वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने महाराजस्व अभियानांतर्गत येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मंगळवारी मेळावा घेण्यात आला.

१४ जोडपी विवाह बंधनात
महाराजस्व अभियान मेळावा : १४ महसूल कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान
एटापल्ली : स्थानिक महसूल व वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने महाराजस्व अभियानांतर्गत येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मंगळवारी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात १४ आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह लावून देण्यात आला. दरम्यान १४ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.
महाराजस्व अभियान मेळावा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहेरीचे उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून एटापल्ली पंचायत समितीचे सभापती दीपक फुलसंगे, उपसभापती संजय चरडुके, पं. स. कृषी विस्तार अधिकारी एस. एल. बोरावार, नायब तहसीलदार आर. डी. मेश्राम, मधुकर रच्चावार, डी. आर. म्हैत्रे आदी उपस्थित होते.
या मेळाव्यात सर्व मान्यवरांच्या साक्षीने आदिवासी विकास विभागामार्फत १४ आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह लावून देण्यात आला. त्यानंतर तहसीलदारांच्या कक्षात १४ महसूल कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयामार्फत आदिवासी लाभार्थ्यांना सौरकंदिलाचे वाटप करण्यात आले. या मेळाव्यात प्राथमिक आरोग्य केंद्र तोडसा, पशुसंवर्धन विभाग, कृषी, महसूल, वन व इतर शासकीय विभागामार्फत स्टॉल लावून नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. अहेरीच्या उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर घेण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन नायब तहसीलदार मधुकर रच्चावार यांनी केले. मेळाव्याला तालुक्यातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)