१३६ युनिटमधून होणार तेंदू संकलन
By Admin | Updated: May 7, 2015 01:16 IST2015-05-07T01:16:08+5:302015-05-07T01:16:08+5:30
तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम तोंडावर आला आहे. मे महिन्याच्या तिसऱ्या ते चौथ्या आठवड्यात हंगामाला सुरूवात होणार आहे.

१३६ युनिटमधून होणार तेंदू संकलन
गडचिरोली : तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम तोंडावर आला आहे. मे महिन्याच्या तिसऱ्या ते चौथ्या आठवड्यात हंगामाला सुरूवात होणार आहे. जिल्ह्यात 'पेसा' अंतर्गत येत असलेल्या १३८ मधून १२८ व गैरआदिवासी अंतर्गत येत असलेल्या ४३ मधून ९ तेंदू युनिटचा टेंडर काढण्यात आला असून जिल्ह्यातील १३६ तेंदूपत्ता युनिटमधून तेंदू संकलन करण्यात येणार आहे. ३३ ग्रामसभा तेंदू संकलन व विक्री करणार असल्याची माहिती वनविभागाने दिली.
गडचिरोली जिल्हा हा ७८ टक्के वनव्याप्त आहे. यामुळे जिल्ह्यात प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात तेंदू संकलन केले जातो. १५ ते २0 दिवस चालणाऱ्या या तेंदू हंगामात नागरिकांना चांगला रोजगार मिळतो. तेंदू संकलन करण्यासाठी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील मजुर मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र यावर्षी 'पेसा 'कायदा अंतर्गत येत असलेल्या १३८ तेंदू युनिटीसाठी सहा वेळा काढण्यात आलेल्या टेंडरमध्ये १२८ तेंदू युनिटचा टेंडर काढण्यात आला. तर गैरआदिवासी अंतर्गत येत असलेल्या ४३ तेंदू युनिटसाठी ७ वेळा काढण्यात टेंडरमध्ये केवळ ९ तेंदू युनिटचा समावेश आहे.
१५ मे पासून सुरू होत असलेल्या तेंदू संकलनामध्ये जिल्ह्यातील ३३३ ग्रामसभा तेंदू संकलन करून तेंदूपत्त्याची विक्री करणार आहेत. संकलन करणाऱ्या ग्रामसभामध्ये गडचिरोली, चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, भामरागड, सिरोंचा, एटापल्ली, धानोरा, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा व कोरची तालुक्यातील काही ग्रामसभांचा समावेश आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी धानोरा तालुक्यातील आयोजित ग्रामसभेत ९८ ग्रामसभांनी स्वत: तेंदू संकलन तेंदूपत्ता विक्रीचा निर्णय घेतला होता. मात्र यासंदर्भात मुख्य वनसंरक्षक यांच्या अध्यक्षतेखाली वनविभाग व ग्रामसभा यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्ह्यातील केवळ ३३ ग्रामसभा तेंदू संकलन व विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे तेंदूपाने खराब होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील सुरू होत असलेल्या तेंदू संकलनातून जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेर हजारो नागरिकांना रोजगार उपलब्ध होतो. गडचिरोली जिल्हा हा उद्योग असल्याने नागरिकांना जास्त प्रमाणात तेंदू संकलनाकडे वळत असतात. १५ ते २0 दिवस चालणाऱ्या या तेंदू संकलनातून एका परिवाराचा चार ते पाच महिन्यांचा उदरनिर्वाह होतो. (शहर प्रतिनिधी)