कत्तलीसाठी नेणाऱ्या १३० जनावरांना जीवदान, हैदराबादला केली जात होती तस्करी

By दिगांबर जवादे | Updated: January 9, 2024 22:09 IST2024-01-09T22:08:44+5:302024-01-09T22:09:09+5:30

बेडगाव पोलिसांच्या मदतीने जनावरांची सुटका करण्यात आली.

130 animals taken for slaughter were smuggled to Hyderabad | कत्तलीसाठी नेणाऱ्या १३० जनावरांना जीवदान, हैदराबादला केली जात होती तस्करी

कत्तलीसाठी नेणाऱ्या १३० जनावरांना जीवदान, हैदराबादला केली जात होती तस्करी

गडचिरोली : कोरची तालुका मुख्यालयापासून चार किमी अंतरावर असलेल्या बेडगाव येथील नागरिकांनी रात्री सापळा रचून गोवंश घेऊन जाणारे चार ट्रक पकडले. या ट्रकमध्ये १३० गोवंश कत्तलीसाठी हैदराबादला नेले जात होते. बेडगाव पोलिसांच्या मदतीने जनावरांची सुटका करण्यात आली.

नक्षलदृष्ट्या कोरची तालुका संवेदनशील असल्याने पोलिस रात्रीच्या वेळी बाहेर पडत नाही. हाच डाव साधून रात्रीच्या सुमारास गोवंशाची तस्करी केली जाते. मागील पाच दिवसांपासून रात्रीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात गाेवंश नेले जात असल्याची माहिती बेडगाव येथील नागरिकांना मिळाली. त्यानुसार रात्री बेडगाव येथील गावकऱ्यांनी सापळा रचून बोरी ते बेडगाव फाट्यावरील रस्त्याच्या मधोमध बैलबंडी आडवी करून ठेवली. गोवंश घेऊन जाणारे चार ट्रक अडवले. यावेळी तस्कर वाहन सोडून पसार झाले. 

या वाहनांच्या मागे पुन्हा पाच ते सहा ट्रक होत्या. मात्र पुढच्या ट्रकवर कारवाई झाली असल्याचे फोनवरून कळताच मागील ट्रक अर्ध्या रस्त्यातूनच पसार झाले. पकडलेल्या चार ट्रकची पाहणी केली असता त्यात १३० गाय व बैल आढळून आले. त्यांच्या पायाला रस्सी बांधण्यात आली होती. रस्सी सोडून त्यांना मोकळे करण्यात आले. याची माहिती बेडगाव पोलिसांना देण्यात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळ गाठले. गोवंश तस्करांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी डिसेंबर महिन्यात कोरची तालुक्यातील सावली गावच्या नागरिकांनी रात्रीच्या वेळी गोवंश तस्करांची दोन ट्रक पकडले होते, हे विशेष.

कोरची तालुका गोवंश तस्करीचा बनतोय अड्डा
कोरची तालुक्याच्या सीमा छत्तीसगड राज्य व गोंदिया जिल्ह्याला लागून आहेत. परिसरातील जनावरे खरेदी करून त्यांना जंगलात बांधून ठेवले जाते. त्यानंतर काही दिवसांनी संधी साधून रात्रीच्या सुमारास ट्रकने तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेले जाते. दरदिवशी १० ते २० ट्रक जनावरे कत्तलीसाठी नेली जातात. कोरची तालुका गोवंश तस्करीचा मुख्य अड्डा बनला आहे.

Web Title: 130 animals taken for slaughter were smuggled to Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.