जिल्ह्यात १३ आरोग्य सहायकांना पदोन्नती
By Admin | Updated: August 1, 2016 01:22 IST2016-08-01T01:22:56+5:302016-08-01T01:22:56+5:30
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रस्तरावर कार्यरत सात आरोग्य सहायक

जिल्ह्यात १३ आरोग्य सहायकांना पदोन्नती
संघटनेला यश : जि. प. सीईओंनी काढले आदेश
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रस्तरावर कार्यरत सात आरोग्य सहायक (पुरूष) व सहा आरोग्य सहायक महिला अशा एकूण १३ आरोग्य सहायकांना आरोग्य पर्यवेक्षक (विस्तार अधिकारी आरोग्य) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे, अशी माहिती जि. प. आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे सचिव विनोद सोनकुसरे यांनी दिली आहे.
यासंदर्भात जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांनी १३ आरोग्य पर्यवेक्षकांचे पदोन्नती आदेश शुक्रवारी काढले आहेत. आरोग्य सहायक पुरूष व महिला यांना पदोन्नती देण्यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. आरोग्य कर्मचाऱ्यांचे पदोन्नती प्रकरणे निकाली काढण्यात प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी २० जुलै रोजी आमरण उपोषणाची नोटीस देऊन उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर जि. प. प्रशासनाच्या वतीने पदोन्नती प्रकरण निकाली काढले. यामुळे आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे. याबाबत संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र खरवडे, नीलू वानखेडे, अनिल मंगर व इतर पदाधिकाऱ्यांनी जि.प. प्रशासनाचे आभार मानले. (प्रतिनिधी)