शिष्यवृत्तीचे १,२६८ अर्ज प्रलंबित

By Admin | Updated: December 24, 2014 22:58 IST2014-12-24T22:58:38+5:302014-12-24T22:58:38+5:30

भारत सरकारकडून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या आॅनलाईन प्रक्रियेत येणाऱ्या अडथळ्यामुळे हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. आॅनलाईन अर्ज केलेल्यांपैकी १ हजार २६८ अर्ज

1,268 applications for scholarships are pending | शिष्यवृत्तीचे १,२६८ अर्ज प्रलंबित

शिष्यवृत्तीचे १,२६८ अर्ज प्रलंबित

महाविद्यालयस्तरावर : ८४ महाविद्यालयांकडून शिष्यवृत्तीचे आॅनलाईन अर्ज सादर नाही
दिलीप दहेलकर - गडचिरोली
भारत सरकारकडून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या आॅनलाईन प्रक्रियेत येणाऱ्या अडथळ्यामुळे हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. आॅनलाईन अर्ज केलेल्यांपैकी १ हजार २६८ अर्ज महाविद्यालयस्तरावर पडताळणीकरिता प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे २७६ कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयांपैकी ८४ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज आॅनलाईन भरले नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार नसल्याचे चिन्ह आहे.
मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयीन तसेच पदवी व पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण घेता यावे, या शिक्षणासाठी त्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी केंद्र शासनाने भारत शिष्यवृत्ती योजना अंमलात आणली आहे. या शिष्यवृत्तीचा लाभ इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, एसबीसी व व्हीजेएनटी आदी प्रवर्गातील इयत्ता ११ वी ते पदव्युत्तरपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिला जातो. जिल्ह्यातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांची संख्या जास्त आहे. चुकीचे बँक खाते क्रमांक नोंदविल्यामुळे तसेच लिंक फेलचा फटका वारंवार बसत असल्याने आॅनलाईन शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला अपेक्षित गती मिळाली नाही.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण इयत्ता ११ वी ते पदव्यूत्तरपर्यंतच्या शिक्षणाची सोय असलेल्या कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाची एकूण संख्या २७६ आहे. २२ डिसेंबरपर्यंत यापैकी १९२ महाविद्यालयांनी १२ हजार ५२९ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे आॅनलाईन
अर्ज भरले आहेत. मात्र यापैकी १ हजार २६८ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जाबाबतची हार्डकॉपी व स्टेटमेंट बी अद्यापही समाजकल्याण कार्यालयाला सादर करण्यात आले नाही. अनुदानित महाविद्यालयांना समाजकल्याण कार्यालयाकडे शिष्यवृत्तीची अर्जाची हार्डकॉपी सादर करण्याची गरज नाही. केवळ स्टेटमेंट बी देणे गरजेचे आहे. मात्र अद्यापर्यंत जिल्ह्यातील अनेक अनुदानित महाविद्यालयांनी समाजकल्याण कार्यालयाकडे स्टेटमेंट बी सादर केले नाही. त्यामुळे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांना विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मंजूर करता आली नाही.
आॅनलाईन अर्ज भरून अर्जाची हार्डकॉपी व स्टेटमेंट बी जोडून समाजकल्याण कार्यालयाकडे सादर करणाऱ्या ६६८ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मंजूर केली असल्याची माहिती समाजकल्याण विभागाकडून मिळाली आहे. आॅनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरताना संबंधीत विद्यार्थी तसेच महाविद्यालयाच्या लिपिकांना विद्यार्थ्याचा अभ्यासक्रम, अनुदानित अथवा विनाअनुदानित वार्षिक उत्पन्न आदींसह बरीच माहिती भरावी लागते. मात्र अनेक महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती अर्ज आॅनलाईन करताना पूर्ण माहिती न भरल्यामुळे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत अडचण आली होती. परिणामी नाशिकच्या समाजकल्याण कार्यालयाच्यावतीने काही दिवस लिंक बंद ठेवण्यात आली होती.
शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी यंदा विद्यार्थ्यांना तसेच महाविद्यालयांना अनेकदा तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज सादर करणे शक्य झाले नाही. त्यामुळे समाजकल्याण विभागाने शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करून न्याय देण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
गतवर्षी २०१३-१४ या सत्रात जिल्ह्यातील एकूण २५२ महाविद्यालयातील २१ हजार ७०९ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज सादर केले होते. यामध्ये इयत्ता ११ वी ते पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंतच्या सर्व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश होता.

Web Title: 1,268 applications for scholarships are pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.