१२६ गावांना सिंगल फेजने वीज पुरवठा
By Admin | Updated: November 24, 2014 22:57 IST2014-11-24T22:57:47+5:302014-11-24T22:57:47+5:30
जिल्ह्यातील १२६ गावांना अजूनही सिंगल फेजनेच विद्युत पुरवठा केला जात असून यामुळे या गावांमधील नागरिकांना विजेच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

१२६ गावांना सिंगल फेजने वीज पुरवठा
गडचिरोली : जिल्ह्यातील १२६ गावांना अजूनही सिंगल फेजनेच विद्युत पुरवठा केला जात असून यामुळे या गावांमधील नागरिकांना विजेच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार ६६८ गावे आहेत. यातील शेकडो गावांना अजूनपर्यंत वीज पुरवठा झाला नाही. त्यामुळे या गावातील नागरिकांच्या घरात अजूनही विजेचा प्रकाश पडला नसून मिनमिनत्या दिव्याच्या प्रकाशातच रात्र काढावी लागते. १० वर्षांपूर्वी गावाची लोकसंख्या कमी असल्याने विद्युत विभागाने जवळपास २०० गावे सिंगल फेजने जोडून विद्युत पुरवठा केला होता. १० वर्षांपूर्वी विजेचा वापर अत्यंत कमी होत असल्याने सिंगल फेजनेही काम चालत होता. मात्र केंद्र शासनाने राजीव गांधी योजनेंतर्गत बीपीएलधारकांना १५ रूपयात वीज जोडणी देण्याची योजना आणली. या योजनेमुळे प्रत्येक घरात वीज कनेक्शन देण्यात आले. त्यामुळे वीज वापरकर्त्यांची संख्या आपोआप वाढली. त्याचबरोबर आज प्रत्येक घरात टीव्ही, पंखा, कुलरचा वापर केला जातो. काही नागरिकांच्या घरी फ्रिजही आढळून येते. विजेवर चालणारी साधणे वाढल्यानेही विजेचा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे विजेचा दाब कमी होत असून बहुतांश वेळा घरातील विद्युत साधणे सुरूच होत नसल्याची तक्रार सिंगल फेज असलेल्या गावातील नागरिकांकडून केली जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अजूनही १२६ गावांमध्ये सिंगल फेजनेच पुरवठा केला जात आहे. विजेचा दाब कमी असल्याने नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन थ्री-फेज वीज जोडणी करण्यात यावी, अशी मागणी अनेकवेळा ग्रामीण भागातील नागरिकांकडून करण्यात आली आहे. मात्र विद्युत विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. भामरागड, एटापल्ली, धानोरा, सिरोंचा, कोरची या चार तालुक्यांमधील सर्वाधिक गावांमध्ये सिंगल फेजने विद्युत पुरवठा केला जात आहे.
शेतकऱ्यांना शासनाने अनुदानातून विहीर बांधून दिली आहे. त्याच्यावर अनुदानातूनच कृषीपंपही उपलब्ध करून दिले आहे. मात्र गावामध्ये सिंगल फेजचा वीज पुरवठा असल्याने सदर कृषिपंप सुरूच होत नसल्याने विहीर व कृषिपंप बेकामी पडून आहे. मागील काही दिवसांमध्ये सिंगल फेजचा पुरवठा थ्री-फेजमध्ये बदलविण्याचे धोरण विद्युत कंपनीने सुरू केले आहे. मात्र थ्री-फेजमध्ये बदलविण्याच्या कामाची गती अत्यंत संथ आहे. याकडे विद्युत विभागाने लक्ष घालून सर्वच सिंगल फेज गावांमध्ये थ्री-फेजने विद्युत पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (नगर प्रतिनिधी)