रोहयोंतर्गत १२३ बांध्यांची निर्मिती
By Admin | Updated: June 29, 2015 02:03 IST2015-06-29T02:03:38+5:302015-06-29T02:03:38+5:30
रोजगार हमी योजनेंतर्गत मागील तीन वर्षात सुमारे १२३ धानाच्या बांध्यांची निर्मिती करण्यात आली आहे.

रोहयोंतर्गत १२३ बांध्यांची निर्मिती
धानाचे उत्पादन : हजारो नागरिकांना मिळाला रोजगार
गडचिरोली : रोजगार हमी योजनेंतर्गत मागील तीन वर्षात सुमारे १२३ धानाच्या बांध्यांची निर्मिती करण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात धान पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. धान पिकाला सिंचनाची गरज भासत असल्याने पाणी टिकून राहावे, यासाठी बांध्या निर्माण केल्या जातात. मात्र यासाठी हजारो रूपयांचा खर्च येतो. अनेक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत राहत असल्याने सदर शेतकरी बांध्यांची निर्मिती करू शकत नाही. परिणामी शेतजमीन पडीक ठेवण्याची पाळी येते. अशा गरीब शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेंतर्गत धानाच्या बांध्यांची निर्मिती करून दिली जाते. २०११-१२ या आर्थिक वर्षात ८५ बांध्यांची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी एक कोटी दोन लाख रूपये एवढा खर्च आला. २०१२-१३ या वर्षात १५ बांध्यांची निर्मिती करण्यात आली. त्याला २७ लाख ४२ हजार रूपये खर्च आला. सन २०१३-१४ मध्ये २३ बांध्यांची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी २३ लाख रूपयांचा खर्च आला आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील हजारो नागरिकांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले. रोजगार हमी योजनेंतर्गत २०११-१२ ते २०१३-१४ या वर्षात १३५ बोड्यांची दुरूस्ती करण्यात आली आहे. (नगर प्रतिनिधी)