१२०० शाळा बनल्या डिजिटल

By Admin | Updated: May 24, 2017 00:27 IST2017-05-24T00:27:31+5:302017-05-24T00:27:31+5:30

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानंतर गडचिरोली जिल्ह्यातील एकूण २ हजार २३ शाळांपैकी मार्च २०१७ अखेरपर्यंत सुमारे १ हजार २०० शाळा डिजिटल बनल्या आहेत.

1200 schools have become digital | १२०० शाळा बनल्या डिजिटल

१२०० शाळा बनल्या डिजिटल

वर्षभरातील भरारी : डिजिटल साधनांच्या वापरातून अध्यापन प्रक्रिया होणार सुलभ व प्रभावी
दिलीप दहेलकर । लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानंतर गडचिरोली जिल्ह्यातील एकूण २ हजार २३ शाळांपैकी मार्च २०१७ अखेरपर्यंत सुमारे १ हजार २०० शाळा डिजिटल बनल्या आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील माहिती मिळणार आहे.
शाळांमध्ये अध्यापन करताना डिजिटल साधनांचा वापर झाल्यास विद्यार्थ्यांची शिक्षणाविषयी तसेच कठीण विषयासंदर्भात आवड वाढेल. त्याचबरोबर शिकताना त्यांची एकाग्रता वाढण्यास मदत होईल, असे शिक्षणतज्ज्ञांच्या लक्षात आल्यानंतर शाळांमध्ये अध्यापन करताना जास्तीत जास्त शैक्षणिक साधने व डिजिटल साधनांंचा वापर करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले. जिल्ह्यात जि.प., न.प. व खासगी अनुदानित व विनाअनुदानित मिळून इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या एकूण २ हजार २३ शाळा आहेत. शाळा डिजिटल करण्यासाठी जि.प.च्या शिक्षण विभागाने नोव्हेंबर महिन्यापासून नियोजन आखले. ग्रामपंचायतीची मदत, लोकवर्गणी यांच्या माध्यमातून शाळांनी निधी गोळा करीत जिल्हाभरातील १ हजार २०० शाळा डिजिटल केल्या आहेत. शाळा डिजिटल करण्यासाठी संबंधित शाळेला एलईडी टीव्ही किंवा अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल, मॅग्नेफाईन ग्लास, मायक्रो कॉस्ट डिव्हाईस, प्रोजेक्टर आदी साधने खरेदी करावी लागतात. शाळेला डिजिटल करण्यासाठी किमान २५ हजार ते जास्तीत जास्त ८५ हजार रूपयांपर्यंतचा खर्च येतो. प्रत्येक वर्ग डिजिटल करण्याचे उद्दिष्ट असले तरी हे उद्दिष्ट लवकर साध्य करणे शक्य होणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम शाळेतील किमान एक वर्ग डिजिटल करण्याकडे विशेष भर देण्यात आला. टप्प्याटप्प्याने शाळेतील संपूर्ण वर्ग डिजिटल करण्यात आले. शाळा डिजिटल झाल्यास अध्यापनाची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल. त्याचबरोबर डिजिटल साधनांचा वापर करून मनोरंजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविता येणार असल्याने विद्यार्थ्यांची उपस्थिती नियमित राहण्यास मदत होणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांची गळती कमी होण्यास मदत होईल, असा अंदाज शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. कमी पटसंख्येच्या शाळेला मोबाईल, मॅग्नेफाईन ग्लास वापरून डिजिटल करण्याची मुभा देण्यात आली आहे.

जिल्हा परिषद शाळांनी असा उभारला निधी
शिक्षण विभागाने शाळा डिजिटल करण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींना पत्र देऊन पाच टक्के पेसा निधी व १४ व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या निधीतून काही मदत शाळेला डिजिटल करण्यासाठी आवाहन केले होते. त्यानुसार काही ग्रामपंचायतींनी शाळेला निधी उपलब्ध करून दिला आहे.
सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून जिल्ह्यातील एकूण ५८ शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत. यातील सर्वच शाळा उच्च प्राथमिक आहेत. प्रत्येक शाळेतील तीन वर्ग डिजिटल केले आहेत. यासाठी प्रत्येकी ८५ हजार रूपयांचा खर्च झाला आहे.

उर्वरित ८२३ शाळाही
लवकरच डिजिटल होणार
माार्च २०१८ पर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा डिजिटल करण्याचे राज्य शासनाचे नियोजन आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित ८२३ शाळा सन २०१७-१८ या सत्रात डिसेंबर अखेरपर्यंत डिजिटल होणार आहेत. तसे नियोजनही आहे.

Web Title: 1200 schools have become digital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.