१२ हजार ९९६ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2016 03:09 IST2016-02-16T03:09:25+5:302016-02-16T03:09:25+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणेच्या वतीने १८ फेब्रुवारी ते २८ मार्च दरम्यान बारावीची

१२ हजार ९९६ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणेच्या वतीने १८ फेब्रुवारी ते २८ मार्च दरम्यान बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. जिल्हाभरातून १२ हजार ९९६ विद्यार्थी यंदा ४१ केंद्रांवरून बारावीची परीक्षा देणार आहेत. परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाने नियोजन केले आहे.
बारावीच्या परीक्षेनंतर विविध विभागांमध्ये प्रवेश घेण्याचे मार्ग मोकळे होतात. त्यामुळे बारावीच्या परीक्षेला टर्नींग पॉर्इंट मानले जाते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेला विशेष महत्त्व आहे. सदर परीक्षा शांततेत पार पडण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग कामाला लागला आहे. जिल्हाभरातून १२ हजार ९९६ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा ४१ केंद्रांवरून घेतली जाणार आहे. मागील वर्षी ४० परीक्षा केंद्र होते. यावर्षी वैरागड येथील एका केंद्राची भर पडली आहे. परीक्षेदरम्यान कॉपीच्या प्रकारावर आळा बसावा यासाठी परीक्षेदरम्यान संबंधित विद्यार्थ्याला शूज घालून येण्यावर बंधन घालण्यात आले आहे. एकादा विद्यार्थी शूज घालून आल्यास त्याला ते शूज बाहेर ठेवावे लागणार आहे. त्याचबरोबर परीक्षेदरम्यान गणक यंत्र, मोबाईल आदी वस्तूंच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी शिक्षण विभाग कामाला लागला आहे. (नगर प्रतिनिधी)
१७ हजार ३४५ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसणार
दहावीची परीक्षा १ ते २९ मार्चपर्यंत चालणार आहे. ६९ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. पोटेगाव येथील विदर्भ विद्यालय व कुरखेडा तालुक्यातील येंगलखेडा येथील पांडव हायस्कूल हे दोन नवीन परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत. जिल्हाभरातील १७ हजार ३४५ विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. दहावीच्या परीक्षेचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे.
पाच भरारी पथकांची निर्मिती
४परीक्षेदरम्यान कॉपीला आळा घालण्यासाठी पाच पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (निरंतर), महिलांचे पथक व माध्यमिक उपशिक्षणाधिकारी यांच्या पथकांचा समावेश आहे. या पथकांव्यतिरिक्त जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षक कधीही भेट देऊन परीक्षेचा आढावा घेऊ शकतात. त्यांच्या पथकालाही कॉपी करताना एखादा विद्यार्थी आढळून आल्यास त्याला निलंबित केले जाणार आहे.
बैठे पथक, दक्षता समितीची राहणार नजर
कॉपीमुक्त वातावरणात इयत्ता बारावीची परीक्षा व्हावी या हेतुने शिक्षण विभागाने प्रत्येक केंद्र स्तरावर बैठे पथकाची व्यवस्था केली आहे. याशिवाय परीक्षा केंद्रस्तरावर दक्षता समित्याही गठीत करण्यात आल्या आहेत. बैठे पथक व दक्षता समितीची कॉपीबहाद्दर परीक्षार्थ्यांवर करडी नजर राहणार आहे.
एकही परीक्षा केंद्र काळ्या यादीत नाही
४मागील दोन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात भयमुक्त व कॉपीमुक्त परीक्षेचे वातावरण तयार केले जात आहे. परीक्षेपूर्वी शिक्षण विभाग कॉपी न करण्याबाबत मार्गदर्शन करीत असल्याने कॉपी करणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात घटली आहे. दोन वर्षांपूर्वी जवळपास पाच परीक्षा केंद्र काळ्या यादीत टाकण्यात आले होते. या केंद्रांवर भरारी पथकांची विशेष नजर राहत होती. यावर्षी मात्र एकही केंद्र काळ्या यादीत टाकलेले नाही.