११ वी प्रवेशाचा मार्ग यंदा सुकर
By Admin | Updated: June 13, 2015 01:44 IST2015-06-13T01:44:00+5:302015-06-13T01:44:00+5:30
नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालात जिल्हाभरातून सुमारे १४ हजार ७३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

११ वी प्रवेशाचा मार्ग यंदा सुकर
दिगांबर जवादे गडचिरोली
नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालात जिल्हाभरातून सुमारे १४ हजार ७३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात ११ व्या वर्गाची प्रवेश क्षमता १४ हजार २०० एवढी आहे. १० वी नंतर विद्यार्थी इरतही अभ्यासक्रमांना प्रवेश घेत असल्याने या वर्षी प्रवेशासासाठी धावाधाव करावी लागणार नाही.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६२ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. यातील आठ महाविद्यालये वरिष्ठ महाविद्यालयांसोबत जोडले आहेत. जो कनिष्ठ महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालयासोबत जोडला जातो, अशा महाविद्यालयांच्या तुकडीची प्रवेश क्षमता ८० एवढी राहते. या आठ महाविद्यालयात एकूण १४ तुकड्या आहेत. हा नियम लक्षात घेता या आठ महाविद्यालयांतील १४ तुकड्यांमध्ये १ हजार १२० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. उर्वरित १५४ कनिष्ठ महाविद्यालये माध्यमिक विद्यालयासोबत जोडली आहेत. या कनिष्ठ महाविद्यालयातील प्रत्येक तुकडीमध्ये ६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या १५४ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २३२ तुकड्या आहेत. यामध्ये १३ हजार ८० विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्या जाणार आहे. असे एकूण १४ हजार २०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची क्षमता कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षा प्रवेश क्षमता थोडीफार कमी असली तरी विद्याथी, आयटीआय, व्यावसायीक अभ्यासक्रमांना प्रवेश घेत असल्याने ११ वीच्या प्रवेशसासाठी धावाधाव करावी लागणार नाही. निर्धारित प्रवेश क्षमतेच्या जास्त प्रवेश देण्याचे अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना आहेत. त्यामुळे प्रवेशाची क्षमता आणखी वाढणार आहे.
आयटीआय व व्यावसायिक अभ्यासक्रमालाही प्रवेश घेणार
कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतून पदवी प्राप्त केल्यानंतर नोकरी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी दहावी पास झाल्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रम करण्याकडे वळतात. गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आयटीआय आहेत. यामध्ये हजारो विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची क्षमता आहे. त्याचबरोबर काही विद्यार्थी पॉलिटेक्नीकला प्रवेश घेतात. तर काही विद्यार्थी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ११ वी व १२ वीचे शिक्षण घेतात. यामुळे ११ वीच्या प्रवेशाची अडचण राहणार नाही.
नामांकित महाविद्यालय होणार फूल्ल
गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात अनेक नामांकित व जुने महाविद्यालये आहेत. काही महाविद्यालये हे शाळांशी संलग्न आहे. अशा महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळावा, अशी पालकांची इच्छा असते. त्यामुळे अशा महाविद्यालयात यंदा प्रवेशासाठी चांगलीच गर्दी उसळणार आहे. विज्ञान शाखेच्या प्रवेशाकरिता तर महाविद्यालयांमध्ये चांगलीच चढाओढ राहणार आहे. भरमसाठ प्रमाणात गुणवत्ता फुगल्यामुळे अनेकांना आपला पाल्य विज्ञान शाखेसाठी पात्र आहे, असा गैरसमज आहे. त्यामुळे विज्ञान शाखेवर विद्यार्थ्यांच्या उड्या पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.