११४ गावांना वीज पुरवठा
By Admin | Updated: April 30, 2015 01:41 IST2015-04-30T01:41:14+5:302015-04-30T01:41:14+5:30
विजेपासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील ११४ गावांना दोन वर्षांत महावितरणतर्फे विज पुरवठा करण्यात आला आहे.

११४ गावांना वीज पुरवठा
गडचिरोली : विजेपासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील ११४ गावांना दोन वर्षांत महावितरणतर्फे विज पुरवठा करण्यात आला आहे. तर दुर्गम व पहाडी भागात असलेल्या १३२ गावांना महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीद्वारे सोलर व पवन उर्जेच्या माध्यमातून विजेचा पुरवठा करण्यात येत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील किती गावांमध्ये वीज पुरवठा पोहोचलेला नाही. याबाबतचे सर्वेक्षण आॅक्टोबर २०१२ मध्ये महावितरण, महसूल विभाग व महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीच्या मार्फतीने करण्यात आले होते. या सर्वेक्षणात एकूण १६६८ गावांपैकी सुमारे २६८ गावांपर्यंत वीज पुरवठा पोहोचला नसल्याचे दिसून आले. वीज ही अत्यावश्यक गरज असल्याने प्रत्येक घरी विजेचा पुरवठा करण्यात यावा, असे निर्देश महावितरण व महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीला देण्यात आले. २६८ गावांपैकी १३६ गावांना विजेचा पुरवठा करण्याची जबाबदारी महावितरणने उचलली.
१३६ गावांपैकी ५९ गावांपर्यंत विजेचे खांब पोहोचले होते. मात्र काही ठिकाणच्या रोहित्रामध्ये बिघाड निर्माण झाला होता. तर काही ठिकाणी विद्युत तारा तुटल्याने या गावांमधील वीज पुरवठा बंद पडला होता. महावितरण कंपनीने बिघाड दुरूस्त करून विजेचा पुरवठा केला. ४५ गावांना वीज पुरवठा झाला नव्हता. या गावांना जिल्हा वार्षिक निधीमधून निधी मंजूर करून महावितरणने वीज खांबांसह वीज पुरवठा करून दिला. मात्र महावितरणने जबाबदारी घेतलेल्या १३६ गावांपैकी २२ गावे अतिदुर्गम, पहाडी क्षेत्रातील असल्याने या गावांना वीज पुरवठा करणे शक्य नसल्याचे दिसून आले. त्यामुळे या गावांना वीज पुरवठा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीकडे देण्यात आली. (नगर प्रतिनिधी)